चंदीगड : हरयाणामधील एका महिला आयएएस अधिका-याने आपल्या वरिष्ठ अधिका-यावर लैंगिक छळ आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या 36 वर्षीय महिला अधिका-याने फेसबुकच्या माध्यमातून हा आरोप केला आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिका-याने महिला अधिका-याकडून करण्यात आलेला आरोप फेटाळला आहे.
महिला अधिका-याने म्हटले आहे की, अधिकृत फाइल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्याने वरिष्ठ अधिकारी मला लैंगिकरित्या त्रास देत आहेत. तसेच, अधिकृत फाइल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया लिहिल्यास त्याचा परिणाम वार्षिक गोपनीय अहवाला (एसीआर) वर होईल, अशी धमकी सुद्धा देण्यात आली आहे. यासंदर्भात तक्रार चंदीगड पोलिसांना रविवारी ईमेलद्वारे पाठविली आहे. तसेच, यासंबंधीची माहिती राज्याचे मुख्य सचिवांना वारंवार फोन आणि मेसेजेस करुनही प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यामुळे फेसबुकवर लेखी तक्रारीचे पाऊल उचलले आहे, असे या महिलेने म्हटले आहे. याशिवाय, वरिष्ठ अधिकाऱ्याने मला 31 मे रोजी एका खोलीत बोलावून घेतले आणि बाकी अधिकाऱ्यांना त्या खोलीत प्रवेश न करण्यास सांगितले. त्यांनी मला विचारले की, मला कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे, विभागीय की किरकोळ काम? आणि मग त्यांनी मला फाईल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया लिहणे बंद करण्यास सांगितले. त्यांनी मला सांगितले की, नववधूला ज्याप्रमाणे गोष्टी समजावून सांगितल्या जातात, त्याप्रमाणेच मी तुला समजावून सांगेन. त्यावेळी त्यांचे वर्तन अनैतिक होते, असेही या महिला अधिका-याने म्हटले आहे.
दरम्यान, वरिष्ठ अधिका-यांने महिला अधिका-याकडून करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, मी यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य काम करुन घेणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी बऱ्याचवेळा तिला अधिकृत फाइल्समध्ये चुका असल्याचे सांगितले होते, परंतु त्या चुका समजावून सांगण्यात काही गैर नाही, त्यांनी सांगितले.