मी ६ वर्षांची असताना दोन पुरुषांनी माझा विनयभंग केला होता”, असा खुलासा आयएएस अधिकारी आणि केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिव्या एस अय्यर यांनी केला. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराबाबत प्रसारमाध्यमांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
“दोन जण प्रेमाने माझ्या शेजारी बसले. ते का स्पर्श करतायेत किंवा इतके प्रेम का दाखवतायेत हे मला समजत नव्हते. त्यांनी माझे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्यावर मात्र ते चुकीचे वाटले आणि मी लगेच तिथून पळाले. नंतर कधीही गर्दीत असताना ते दोघे आहेत का हे मी काळजीपूर्वक बघायची. पण, अशा घटनांपासून वाचण्याचे भाग्य सर्वच मुलींना मिळत नाही” असे त्या म्हणाल्या आणि पालकांच्या पाठिंब्यामुळे त्या धक्क्यातून सावरणे शक्य झाल्याचे सांगितले.
लहानपणी झालेल्या अत्याचारांमुळे एखाद्याला आयुष्यभर त्रास होतो. अशा वाईट काळात पालकांची साथ महत्त्वाची असते आणि मुलांना “चांगला स्पर्श” आणि “वाईट स्पर्श” यातील फरकाची जाणीव करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.