नवी दिल्ली - देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे कारण देत काही दिवसांपूर्वीच एका आयएएस आधिकाऱ्याने पदाचा राजीनामा दिला होता. ही घटना ताजी असतानाच आता कर्नाटकचे आणखी एक आयएएस अधिकारी एस. शशिकांत सेंथिल यांनी शुक्रवारी सेवेचा राजीनामा दिला. तसेच लोकशाहीच्या मुल्यांसोबत तडजोड केली जात असल्याचं सेंथील यांचं म्हणणे आहे.
दक्षिण कन्नड जिल्ह्याचे उपायुक्त सेंथील यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला असून राजीनामा देण्याचा निर्णय पूर्णत: वैयक्तीक असल्याचे त्यांनी नमूद केले. सेंथील यांनी आपल्या मित्रांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, लोकशाहीच्या मुल्य संकटात असताना प्रशासकीय अधिकारी म्हणून सरकारमध्ये काम करत राहणे माझ्यासाठी अनैतिक आहे. कोणत्याही घटनेमुळे किंवा एखाद्या व्यक्तीमुळे राजीनाम्याचा निर्णय घेतला नाही. यावर विधान परिषदेचे सदस्य इव्हान डिसूझा आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सेंथील यांच्या राजीनाम्यानंतर दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या मुख्यालयासमोर विरोध प्रदर्शन केले.
आयकर, सीबीआय, ईडी आणि न्याय व्यवस्थेत होत असलेल्या हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांचं स्वातंत्र हिरावलं जात आहे. भारत ज्या दिशेने निघाला आहे, त्यावर सेंथील यांचा राजीनामा म्हणजे एक इशारा आहे. लोकशाहीची मुल्य संकटात आहेत. तसेच देशात काहीही संविधानाप्रमाणे सुरू नाही. त्यातच आएएस अधिकारी केंद्राच्या अखत्यारित काम करत आहेत. त्यांचही स्वतंत्र हिरावलं असल्यामुळेच सेंथील यांनी राजीनामा दिल्याचा दावा काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
मुळचे तामिळनाडूमधील असलेले सेंथील २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, दक्षिण कन्नडमधील लोक आणि लोकप्रतिनिधी माझ्या बाबतीत उदार आहेत. मात्र मला सोपविलेले काम मी अर्ध्यात सोडून देत आहे. त्यामुळे मी येथील लोकांची माफी मागतो.