बाडमेर - राजस्थान कॅडरमधील बहुचर्चित आयएएस अधिकारी टीना डाबी यांनी बाडमेर जिल्हाधिकारी पदभार स्वीकारल्यापासून पुन्हा चर्चेत आल्या आहेत. जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी बुधवारी फिल्मीस्टाईल एका स्पा सेंटरमध्ये अचानक धाड टाकली. या स्पा सेंटरचा दरवाजा आतून उघडत नसल्याने त्या संतापल्या, त्यानंतर जोपर्यंत गेट उघडत नाही तोवर मी इथेच बसून राहिन असं सांगत त्यांनी तिथेच तळ ठोकला. त्यानंतर टीना डाबी यांच्या आदेशावर पोलिसांनी गेट तोडून आत प्रवेश केला तेव्हा तिथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
जेव्हा पोलीस स्पा सेंटरमध्ये घुसले तेव्हा ५ युवती, २ युवक आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बाडमेरमधील बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी पुढाकार घेत मोहिम हाती घेतली आहे. त्यातूनच बुधवारी त्या चामुंडा सर्कल चौकात गेल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची नजर एका स्पा सेंटरवर पडली तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना त्या दुकानात जाऊन काय चाललंय ते तपासा असा आदेश दिला.
मात्र स्पा सेंटरमध्ये पोलिसांना प्रवेश मिळाला नाही तेव्हा स्वत: जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी आत लपून का बसलात, जोपर्यंत तुम्ही दरवाजा उघडणार नाही तोपर्यंत मी इथेच बसणार असा पवित्रा घेतला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पोलीस अधिकाऱ्यांनी हतोड्याने स्पा सेंटरची काच तोडून आतून दरवाजा उघडला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी स्पा सेंटरमध्ये घुसले तेव्हा पोलिसांना आतमध्ये ५ युवती आणि २ युवकांना अश्लील कृत्य करताना पाहिले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
स्थानिक लोकांकडून शहरात पोलिसांच्या समंतीने स्पा सेंटरच्या आड चुकीची कामे होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तेव्हा टीना डाबी यांना पाहून स्पा सेंटरचा संचालक पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्याला पाहून टीना डाबी यांना संशय आला त्यामुळे त्यांनी पूर्ण कारवाई होईपर्यंत तिथेच उभ्या राहिल्या. शहरातील लोकांकडून अनेकदा स्पा सेंटरच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार होत होती. अनेकदा पोलिसांनी कारवाई केली तरीही ते सुरूच होते. हे स्पा सेंटर कामगार विभागाच्या परवान्याने चालत होते. याठिकाणी पश्चिम बंगाल, यूपी, बिहार आणि नेपाळहून मुलींना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करण्यात येत होता.