नवी दिल्ली-
एखाद्या परीक्षेत अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून जग काही संपत नाही आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे गुजरातच्या भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा हे आहेत. तुषार सुमेरा यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत काठावर पास झाले होते. पण मेहनत आणि जिद्दीनं त्यांनी जिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. आयएएस अवनीश शरण यांनी तुषार यांची कहाणी सोशल मीडियात शेअर केली आहे.
छत्तीसगड कॅडरचे आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक ट्विट करत भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांची इयत्ता दहावीची मार्कशिट शेअर करत सुमेरा समाजासाठी कसे आदर्श व्यक्तीमत्व आहेत याची माहिती दिली आहे. तुषार सुमेरा यांना इयत्ता दहावीत खूप कमी गुण मिळाले होते. तुषार सुमेरा यांना इंग्रजीत १०० पैकी ३५, गणितात ३६ आणि विज्ञान विषयात ३८ गुण प्राप्त झाले होते.
तुषार यांची गुणपत्रिका पाहून संपूर्ण गावानं तसंच त्यांच्या शाळेनंही तुषार आयुष्यात काहीच करू शकणार नाहीत असं म्हटलं होतं. पण तुषार यांनी मेहनत करुन आज यशाचं शिखर गाठलं आणि टीकाकारांचं तोंडच बंद केलं आहे. तुषार आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचंही आयएएस धिकारी अवनीश यांनी म्हटलं आहे.
अवनीश यांच्या ट्विटवर जिल्हाधिकारी तुषार यांनीही रिप्लाय देत अवनीश यांचे आभार व्यक्त केले आहेत. सोशल मीडियात या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत असून तुषार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी डिग्री नव्हे, तर तुमच्यातील टॅलेंट महत्वाचं ठरतं अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी तुमच्यातील कौशल्य ग्रेड किंवा रँकनुसार निश्चित केलं जाऊ शकत नाही असं म्हटलं आहे.
कोण आहेत तुषार सुमेरा?तुषार सुमेरा यांच्या ट्विटर हँडलवरील माहितीनुसार ते सध्या भरुचचे जिल्हाधिकारी आणि न्याय दंडाधिकारी आहेत. 2012 मध्ये त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि ते आयएएस अधिकारी बनले होते. भरुचमध्ये त्यांनी उत्कर्ष अभियानाअंतर्गत अनेक कामं केली आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांचं कौतुक केलं होतं.
शालेय जीवनात फक्त काठावर पास झालेल्या तुषार यांनी उच्च शिक्षण कला शाखेतून केलं. बीएड केल्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. हीच नोकरी करताना त्यांना जिल्हाधिकारी बनण्याचा विचार आला आणि त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली होती.