ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - नक्षलवादी तसंच दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्यांसाठी फक्त अश्रू ढाळत शोक व्यक्त करण्यापेक्षा आयएएस अधिका-यांनी त्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. आयएएस अधिका-यांनी पुढाकार घेत शहिदांच्या कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशासाठी जीवाची बाजी लावून लढत असताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबावर त्यांच्यानंतर हालाखीत राहण्याची वेळ येऊ नये यासाठी आयएएस अधिका-यांनी हे स्तुत्य पाऊल उचललं आहे. त्यांच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण आणि कुटुंबाला लागणारी आर्थिक मदत याची काळजी अधिकारी घेतील.
"आयएएस अधिका-यांच्या संघटनेने देशाची सुरक्षा करत असताना शहिद झालेल्या संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलिस आणि राज्य पोलीस दलातील शहिद जवानांच्या कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक अधिकारी एका कुटुंबाला पाच ते दहा वर्षांसाठी दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करेल. ज्या कुटुंबाला दत्तक घेण्यात येईल ती शक्यतो आयएएस अधिका-याची नियुक्ती असणा-या राज्यातील असेल", अशी माहिती इंडियन सिव्हिल अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (सेंट्रल) असोसिएशनचे सचिव संजय भुसरेड्डी यांनी दिली आहे.
"अधिका-याला कुटुंबाला थेट आर्थिक मदत करण्याची गरज नाही. मात्र गरजेतपुरता त्यांना हात द्यावा जेणेकरुन दैनंदिन जीवनात त्यांना कोणत्या समस्या होणार नाहीत. तसंच त्यांच्यात सुरक्षा आणि गरजेच्या वेळी देश आपली काळजी घेत असल्याची भावना निर्माण व्हावी", असं सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितलं आहे.
2012 ते 2015 मधील बॅचच्या 600 ते 700 अधिका-यांना त्यांची ज्या भागात नियुक्ती असेल तेथील किमान एका कुटुंबाला दत्तक घेण्यास सांगण्यात येणार आहे. यासाठी अधिकार स्वत: पुढाकार घेऊन कुटुंबाला भरपाई, पेन्शन, ग्रॅच्युइटी किंवा सरकारकडून जाहीर करण्यात आलेला पेट्रोल पंप, जमीन, नोकरी या सेवा व्यवस्थित मिळत आहेत की नाही याची काळजी घेतील. त्याचप्रमाणे मुलांना सरकारच्या स्किल इंडिया किंना डिजिटल इंडिया अंतर्गत योग्य शिक्षण किंवा कौशल्य शिक्षण मिळत आहे की नाही याचीदेखील जबाबदारी घेतील. जर कुटुंबाला एखादा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी लागणारी मदतही अधिकारी करतील.