नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एक IAS अधिकारी आणि एअरटेल (Airtel) मोबाइल कंपनीच्या कर्मच्यातील नंबर पोर्ट करण्यासंदर्भातील संभाषण प्रचंड चर्चेत आले आहे. यात आयएएस अधिकारी एअरटेलच्या सेवेवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. इतकेच नाही तर व्याकरणाच्या चुका 5-5 वेळेस नीट लिहून काढा तरच मी तुमच्याशी बोलेन असेही सुनावत आहे.
मंगळवारी आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर मोबाइल कंपनी एअरटेलला टॅग करून एक ट्विट केले. यात त्यांनी आधीच्या अनुभवाबाबत तक्रार केली आणि नंबर पोर्ट करण्याची तयारी दर्शवली. पोर्टचा मेसेज करताच त्यांना तातडीने उत्तर मिळाले. त्यावर, "कस्टमर केअरला कॉल केल्यावर कोणताही प्रतिसाद मिळत नाही, पण मोबाइल नंबर पोर्ट करण्याचा मेसेज केला की विचारही करता येणार नाही इतके कॉल आणि मेसेज येऊ लागतात... कंपनीचा मालकच घरी येतो की काय असे वाटायला लागते," असे शरण यांनी म्हटले. ज्यावर उत्तर देताना एअरटेलच्या कस्टमर केअरने, "सामान्यपणे असे कधी होत नाही, आम्ही आमच्या ग्राहकांना आणि त्यांच्या समस्यांना महत्त्व देतो. ग्राहकांशी असलेले नाते तोडायचे नाही, आम्ही मदत करण्यास तयार आहोत," असे ट्विट केले. पण, "मला आता तुमची सेवा नकोय. मी आधीच पोर्टची प्रकिया सुरू केली आहे. पण शेवटची एक मदत करा, आता मला फोन किवा मेसेज करून त्रास देऊ नका," असे शरण यांनी सांगितले.
व्याकरणाच्या चुका 5-5 वेळेस नीट लिहून काढा -
यानंतर संभाषणादरम्यान, आयएएस आणि एअरटेल कस्टमर केअरकडून अनेक ट्विट केले गेले. त्यात एअरटेलने केलेल्या एका ट्विटमध्ये व्याकरणाच्या बऱ्याच चुका बघून मात्र अवनीश शरण चांगलेच संतापले. त्यांचे नावही चुकीचे लिहिले होते. तो स्क्रीनशॉट शेअर करत "आधी तुमची हिंदी ठीक करा, व्याकरणाच्या चुका 5-5 वेळेस नीट लिहून काढा, तरच मी तुमच्याशी बोलेन," असे त्यांनी सुनावले. सोशल मीडियावर सध्या दोघांचे संभाषण चांगलेच व्हायरल होत आहे. आमचाही असाच अनुभव आहे, पोर्टचा मेसेज केल्यावरच मोबाइल कंपन्यांना जाग येते, अशा प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत.