कानपूर:उत्तर प्रदेशात जबरदस्तीने धर्मांतरविरोधी मोहीम राबवणाऱ्या सरकारसमोर त्यांच्याच एका IAS अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. सध्या यूपीतील एका आयएएस अधिकाऱ्याचा कथित धर्मांतराबाबतचा वादग्रस्त व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर यूपी सरकारने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष इफ्तिखरुद्दीन यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आयएएस अधिकारी मोहम्मद इफ्तिखरुद्दीनचे धर्मांतर टोळीशी संबंध समोर येत आहेत. रिपोर्टनुसार, त्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत धर्मांतराबाबत चर्चा सुरू होती. या चर्चेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात ते काही मुस्लिम समाजाच्या लोकांसोबत बसून धर्मांतराच्या फायद्यांची माहिती देणाऱ्या वक्त्याला ऐकत आहे. एवढेच नाही तर काही व्हिडिओमध्ये आयएएस इफ्तिखरुद्दीन इस्लामच्या प्रचाराबद्दलही बोलताना दिसत आहेत.
पोलिस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
व्हिडिओमध्ये वरिष्ठ आयएएस इतर समाजातील लोकांना कट्टरावादाचे धडे देत असल्याचा आरोप आहे. व्हिडिओ त्यांच्या निवासस्थानाचा असल्याचे सांगितले जात आहे. ही प्रकरण समोर आल्यानंतर सोमवारी पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी व्हायरल व्हिडिओचा तपास एडीसीपी पूर्व सोमेंद्र मीणा यांच्याकडे सोपवला आहे.
व्हिडिओमुळे यूपीमध्ये खळबळ
व्हिडिओ कधीचा आहे, कोणी काढला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. या व्हिडिओबाबत कानपूरचे भूपेंद्र अवस्थी यांनी सीएम पोर्टलवर तक्रार करत आयएएस अधिकाऱ्याविरोधात चौकशीची मागणी केली आहे. भूपेश अवस्थी हे मठ आणि मंदिर समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.