भोपाळ : आज अनेक पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये, इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी धडपडत असतात. यामुळे मुलांवर अपेक्षांचा आणि शिक्षणाचा मोठा ताण पडत चालला आहे. मात्र, एका आयएएस अधिकाऱ्याने त्याच्या चिमुकलीला चक्क सरकारी अंगणवाडी शाळेत घातले आहे. सामान्या पालकच सीबीएसई, आयसीएसई शाळांचा आग्रह धरत असताना या अधिकाऱ्याने लोकांमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची मुले त्यांना हव्या त्या शाळांमध्ये सहज प्रवेश घेऊ शकतात. प्राथमिक शिक्षण त्यानंतर परदेशात शिक्षणासाठी पाठविणे हे त्यांच्यासाठी भूषणावह असते. मात्र, मध्य प्रदेशचे आयएएस अधिकारी आणि कटनीचे जिल्हा दंडाधिकारी डॉ. पंकज जैन यांनी त्यांच्या चिमुकलीला एका सरकारी शाळेच्या अंगणवाडीमध्ये घातल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या मुलीचे नाव पंखुडी आहे. विशेष म्हणजे पंखुडी ज्या शाळेत जाते त्या परिसरात 4-5 चांगल्या इंग्रजी शाळा आहेत.
याबाबत पंकज जैन यांना विचारले असता त्यांनी दिलेले उत्तरही विचार करायला लावणारे आहेत. पंखुडी ज्या अंगणवाडीमध्ये शिकायला जाते तिथे प्ले स्कूल सारखेच वातावरण आहे. जेव्हा एखादा जबाबदार अधिकारी त्याच्या मुलांना सरकारी शाळेत पाठवितो तेव्हा त्या शाळेतील परिस्थितीमध्ये आपोआपच सुधारणा होते. जर काही कमतरता असेल तर त्यासाठी आपण बोलू शकतो. यामुळे तेथील शिक्षणाचा दर्जा आपोआप उंचावतो.
जैन यांचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना एक पत्रही पाठवत त्यामध्ये लोक सेवक समाजासाठी प्रेरणा असतात. लोक त्यांच्यासारखेच वागायचा प्रयत्न करतात. तुमच्या या निर्णयामुळे मी प्रभावित झाले आहे. यामुळे सरकारी सेवकांचे कामा प्रती दायित्व वाढेल, असे म्हटले आहे.
राज्यपालांचे हे पत्र सोशल मिडियावर कमालीचे व्हायरल होत आहे. लोकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनीही जैन यांचे अभिनंदन केले आहे.