एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क
रांची : झारखंडमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांनी मोठ्या रकमा नेत्यांपर्यंत पोहोचविल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता ईडी या नेत्यांपर्यंत पोहोचू शकते. ईडी सोमवारी तीन जिल्ह्यांच्या जिल्हा खनन अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे. यासाठी त्यांना समन्स पाठविले आहे. त्यात साहिबगंजचे विभूतीकुमार, दुमकाचे कृष्णचंद्र किस्कू व पलामूचे आनंद कुमार यांचा समावेश आहे.
त्यानंतर अन्य जिल्हा खनन अधिकाऱ्यांची चौकशी होईल. मायनिंग लीज वाटप व अवैध खनन प्रकरणात चौकशी केली जाईल. यासाठी त्यांना किती रुपये मिळाले व ते कोणा-कोणाकडे पोहोचविण्यात आले, याची माहिती घेतली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा सिंघल यांच्या चौकशीतून ही बाब बाहेर आली आहे की, मोठे नेते व भागातील प्रभावशाली लोकांच्या संरक्षणात अनेक जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर वसुली केली जात होती.
ती प्रभावशाली महिला कोण?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा सिंघल व राज्यातील एका शक्तिशाली महिलेच्या व्हॉट्सॲप चॅटने ईडीला खाण व उद्योगाचा मार्ग दाखविला. या महिलेचा खनन क्षेत्रात प्रभाव आहे. या महिलेच्या इशाऱ्यावर सत्तेतील लोक कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असतात.