लाखो विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करत असतात. असे अनेक विद्यार्थी आहेत जे वर्षानुवर्षे तयारी करतात, पण तरीही त्यांना यश मिळत नाही, तर काही असे आहेत की, जे त्यांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नातच मोठं यश मिळवतात. पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवासी रुक्मणी रियार या देखील त्यापैकीच एक आहेत. कोणत्याही कोचिंग क्लासच्या मदतीशिवाय त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली आणि ऑल इंडिया सेकंड रँक मिळवला. आयएएस रुक्मणी रियार यांची यशोगाथा जाणून घेऊया...
रुक्मणी रियार या लहानपणी अभ्यासात फारशा हुशार नव्हत्या आणि त्यामुळे त्या सहावीत नापास झाल्या, पण त्यानंतर त्यांनी खूप मेहनत केली, घवघवीत यश मिळवलं. आज प्रत्येकजण त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुक्मणी यांनी गुरुदासपूरमध्ये तिसरीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या डलहौजीच्या सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये गेल्या.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रुक्मणी यांनी अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून सोशल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं, त्यात त्यांना गोल्ड मेडल मिळालं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रुक्मणी यांनी अनेक ठिकाणी इंटर्नशिपही केली आणि त्याच दरम्यान त्यांचं लक्ष यूपीएससीकडे गेलं.
UPSC ची तयारी सुरू केली आणि आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे साध्य केलं. काही लोक वर्षानुवर्षे यासाठी खूप तयारी करतात. रिपोर्ट्सनुसार, रुक्मणी यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी कोणतंही कोचिंग घेतलं नाही, स्वत: अभ्यास केला. २०११ मध्ये, यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया सेकंड रँक मिळविला आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या.
UPSC ची तयारी करण्यासाठी रुक्मणी यांनी सहावी ते बारावीपर्यंत NCERT च्या पुस्तकांचा अभ्यास केला होता आणि दररोज वर्तमानपत्रं आणि मासिकं वाचण्याची सवय लावली होती. या गोष्टींमुळे त्यांना मुलाखतीत खूप मदत झाली. त्यांनी गेल्या अनेक वर्षांच्या यूपीएससीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि मॉक टेस्टही दिल्या. त्याचा परिणाम असा झाला की, पहिल्याच प्रयत्नात आयएएस अधिकारी होण्याचं त्यांचं मोठं स्वप्न पूर्ण झालं.