केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लाखो उमेदवार वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून परीक्षा उत्तीर्ण होण्याची तयारी करतात. मात्र, त्यापैकी मोजकेच या परीक्षेत यश मिळवतात. त्यापैकी फक्त काही उमेदवार असे आहेत, ज्यांनी UPSC परीक्षेची तयारी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत पूर्ण केली आहे. निवडलेल्या उमेदवारांच्या तुलनेत UPSC नागरी सेवा परीक्षा त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणारे आणि IAS पद मिळवणारे फारच कमी उमेदवार आहेत.
IAS सौम्या शर्मा यांची गोष्ट ही अशीच प्रेरणादायी आहे. ज्यांनी 2018 साली पहिल्याच प्रयत्नात UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया 9 वा क्रमांक मिळवला. मिळालेल्या माहितीनुसार, सौम्या शर्मा या दिल्लीच्या रहिवासी आहेत आणि वकील देखील आहे. तयारीच्या अवघ्या 4 महिन्यांत त्यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा पास होऊन घवघवीत यश मिळवलं.
UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी IAS सौम्या शर्मा आदर्श आहेत. सौम्या शर्मा यांची वयाच्या 16 व्या वर्षी ऐकण्याची क्षमता कमी झाली होती, पण त्यांनी IAS होण्याचं स्वप्न सोडलं नाही. शालेय शिक्षणानंतर सौम्या यांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि 2017 मध्ये UPSC परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. सौम्या यांनी या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली आणि कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.