आयएएस अधिकारी सोनिया मीणा यांचं नाव अनेकदा चर्चेत असतं. सोनिया मीणा यांनी २०१३ मध्ये UPSC उत्तीर्ण केली होती, त्यांना ऑल इंडिया ३६ वा रँक मिळाला होता. सोनिया यांनी पहिल्याच प्रयत्नात ही कामगिरी केली होती. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्ती झाली असून सध्या सोनिया नर्मदापुरमच्या जिल्हाधिकारी आहेत.
आपल्या ११ वर्षांच्या सेवेत सोनिया यांनी असंख्य गुन्हेगार, गुंड आणि माफियांचा बंदोबस्त केला आहे. त्यांचं नाव ऐकताच माफियांचा थरकाप होतो, म्हणूनच त्यांना माफियांचा कर्दनकाळ असं म्हटलं जातं. सोनिया मीणा यांची ओळख कणखर अधिकारी अशी आहे. त्या मूळच्या राजस्थानच्या सवाई माधोपूरच्या आहेत. सोनिया मीणा यांचे वडील टीका राम मीणा हे देखील निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते केरळ केडरचे आयएएस होते.
२०१७ मध्ये जेव्हा सोनिया एसडीएम पदावर तैनात होत्या, तेव्हा त्यांनी खाण माफिया अर्जुन सिंहच्या विरोधात कारवाई केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनिया मीणा जिथे राहिल्या तिथे खाण आणि दारू माफियांवर कारवाई झाली आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जीएस अहलुवालिया यांनी नर्मदापुरमच्या कलेक्टर सोनिया मीणा यांना जमिनीशी संबंधित खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
सोनिया मीणा या कोर्टात पोहोचल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या जागी एडीएम डीके सिंह यांना पाठवलं होतं. यावेळी न्यायाधीशांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र दाखविल्याबद्दल एडीएमवर संताप व्यक्त केला होता. त्यांनी मुख्य सचिवांकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुचित वर्तनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.