बेटा, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे, कारण शिक्षणामुळेच आपलं आयुष्य चांगलं होऊ शकतं. या गरिबीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही. हाच कानमंत्र विशालला त्याच्या वडिलांनी लहानपणापासून दिला होता. वडिलांनी दिलेल्या या मंत्राने आपण जीवनात यश मिळवू असा निर्धार विशालने केला होता. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. वडिलांचं निधन झालं तेव्हा विशाल नववीत होता. पण त्याने हार मानली नाही. मेहनत करून विशाल कुमार IAS झाले आहेत. त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...
वडिलांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंब चालवण्याची जबाबदारी विशाल य़ांच्या आईच्या खांद्यावर आली. त्यांच्या आईने घर चालवण्यासाठी आणि तीन मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी शेळीपालन करण्यास सुरुवात केली. तीन भावंडांमध्ये विशाल सर्वात मोठे होते. कुटुंब खूप अडचणीत होतं आणि अशा परिस्थितीत त्यांचे गुरू गौरी शंकर प्रसाद यांचा आधार मिळाला. गौरी शंकर यांनी विशालला कठीण परिस्थितीतही पुढे जाण्याची प्रेरणा तर दिलीच, शिवाय अभ्यासासाठी आर्थिक मदतही केली.
बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या विशाल कुमार यांच्या संघर्षाची कहाणी इथून सुरू झाली. एकीकडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि दुसरीकडे आयुष्यात काहीतरी करण्याचं स्वप्न. आईची मेहनत, वडिलांची शिकवण आणि गुरू गौरी शंकर प्रसाद यांच्या मदतीने विशाल पुढे गेले. त्यांच्या गुरूंनी त्याला शाळेची फी भरण्यास मदत केली. वडिलांच्या निधनानंतर तीन वर्षांनी २०११ मध्ये, १२ वीच्या वर्गात ते आपल्या जिल्ह्यात अव्वल आले. यानंतर इंजिनीअरिंग करायचे ठरवले.
आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यासाठी पाटणा येथील अभयानंदच्या सुपर ३० कोचिंगमध्ये प्रवेश घेतला. विशाल यांना मेहनतीचे फळ मिळाले आणि आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळाला. इंजिनिअरिंग केल्यानंतर रिलायन्समध्ये नोकरी लागली आणि त्यांचे आयुष्य पुन्हा रुळावर येऊ लागले. मात्र, विशाल यांना नोकरीमध्ये रस नव्हता आणि काही काळानंतर ते राजस्थानमधील कोटा येथील एका संस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले.
कोटामध्ये राहून विशाल यांनी ठरवलं की यूपीएसीची तयारी करायची. २०२० मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. विशाल यांनी प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी मुख्य परीक्षा उत्तीर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर नोकरी सोडून UPSC वर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. नोकरी सोडून तयारी सुरू केली. एक वर्षाच्या तयारीनंतर २०२१ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यावेळी निकाल वेगळा लागला, UPAC मध्ये ४८४ वा रँक मिळाला. विशाल त्यांच्या यशाचे श्रेय त्यांची आई आणि त्याचे गुरू गौरी शंकर प्रसाद यांना देतात.