India-Australia Final Match : भारताने वन डे विश्वचषक गमावल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापल्याचे दिसते. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला, ज्यावरून विरोधी पक्ष सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करत आहेत. खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीवरून 'पनौती' म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. खरं तर पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान यांनी या सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी हजेरी लावली होती. मात्र, नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा दारूण पराभव झाल्यानंतर राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सुरू आहे.
विरोधक पंतप्रधान मोदींसह भाजपाला लक्ष्य करत असताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक अजब विधान करून आपल्या पक्षाचा बचाव केला. तसेच त्यांनी भारताच्या पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडल्याचं दिसते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मदिवसाचा दाखला देत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, भारत हा सामना हरला कारण त्या दिवशी इंदिरा गांधींचा वाढदिवस होता.
यासोबतच त्यांनी बीसीसीआयला विनंती केली की, नेहरू-गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा जन्मदिवस असेल त्या दिवशी भारताचे अंतिम सामने होणार नाहीत याची काळजी घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणाऱ्यांशी विरोधी पक्षांची मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हिमंता बिस्वा सरमांचं टीकास्त्र अंतिम फेरीपर्यंतचे सर्व सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला अन् विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. याबद्दल बोलताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले, "आपण सर्व सामने जिंकलो आणि अंतिम फेरीत हरलो. मग आपण नक्की कशामुळे सामना गमावला? तेव्हा मला दिसले की विश्वचषकाचा अंतिम सामना इंदिरा गांधींच्या जन्मदिवशी होता. इंदिरा गांधींच्या जन्मदिवशी भारताने विश्वचषक फायनल खेळली आणि देश हरला. त्यामुळे मी बीसीसीआयला विनंती करेन की कृपया गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा जन्मदिवस असेल त्या दिवशी भारताचा सामना आयोजित करू नये. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातून मी तरी हे शिकलो आहे."