गुजरातमधील अहमदाबाद येथे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दरम्यान, अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय (SVPI) विमानतळाने शनिवारी रात्री एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये प्रवाशांना सांगण्यात आले आहे की, विश्वचषक सामन्यापूर्वी अहमदाबादमध्ये भारतीय वायुसेनेचा एअर शो होणार आहे, ज्यासाठी दुपारी 1:25 ते 2:10 या वेळेत एअरस्पेस बंद ठेवण्यात येणार आहे.
विमानतळाने जारी केलेल्या निवेदनात, प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, जर ते SVPI विमानतळावरून प्रवास करत असतील तर प्रवासाशी संबंधित औपचारिकता आणि सुरक्षा प्रोटोकॉलसाठी अतिरिक्त वेळ घेऊन घरातून निघावे. तसेच, प्रवास प्रक्रियेसाठी अतिरिक्त वेळ देऊन निघून जा. 17 आणि 19 नोव्हेंबर रोजी 1:25 ते 2:10 पर्यंत एअरस्पेस बंद राहील. तुमची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद, असे निवेदनात म्हटले आहे.
याचबरोबर, विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक असणार आहे, असे अहमदाबाद विमानतळाकडून सांगण्यात आले आहे. विमानतळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी टर्मिनल आणि लँडसाइडमधील सर्व सुरक्षा पथके प्रवाशांच्या वाढत्या संख्येसाठी स्टँडबायवर ठेवण्यात आली आहेत. अंतिम सामन्यादरम्यान रात्रीच्या पार्किंगसाठी विमानतळावर त्वरित 15 स्टँड उपलब्ध आहेत, त्यापैकी सहा व्यावसायिक जेट विमानांच्या ऑपरेशनसाठी उपलब्ध आहेत.
दरम्यान, अहमदाबाद विमानतळाचे एअरस्पेस बंद होणार असल्यामुळे आकासा एअरने प्रवाशांसाठी एक स्वतंत्र निवेदन जारी केले आहे. यामध्ये प्रवाशांना सांगण्यात आले आहे की, गुजरातहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या फ्लाइट्सला उशीर होण्याची शक्यता आहे. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांमुळे विमानतळावर जास्त ट्रॅफिक असणार असल्याचे एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या उड्डाणाच्या तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.