नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयसीआयसीआय बँक चालू आर्थिक वर्षात नव्या ४०० शाखा उघडणार आहे, तर देशात नवे एक हजार एटीएम बसविणार आहे. बँकेचा विस्तार करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. आयसीआयसीआयचे मुख्य संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी सांगितले की, बँकेच्या विस्तारासाठी शाखा आणि एटीएम यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशाल नेटवर्क असलेल्या बँकांना ग्राहकही पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. जेव्हा एखादा ग्राहक बँकेशी आर्थिक व्यवहार करतो, तेव्हा घरापासून बँकेचे अंतर किती आहे याला महत्त्व दिले जाते, असेही पाहणीत स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर बँकेने शाखांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून ग्राहकांशी संबंध वाढविण्यास मदत होणार आहे. अर्थात, शाखा विस्ताराचे हे स्वरूप कसे असेल याबाबत माहिती देण्यात आली नाही.
आयसीआयसीआय बँक देशात उघडणार ४०० नव्या शाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2016 5:31 AM