नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज निकाल देणार आहे. या प्रकरणावरील सुनावणी अंतिम टप्प्यात झाली असून निकाल भारताच्या बाजूने लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गुप्तहेर आणि दहशतवादीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच, आपला निर्णय राखून ठेवला होता. आज आंतरराष्ट्रीय न्यायालय आपला निकाल देणार आहे, या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या सुनावणीसाठी पाकिस्तानची कायदे विषयक टीम हेग येथे पोहचली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार पाकच्या कायदे विषयक टीमचे नेतृत्व ज्येष्ठ वकील मंसूर खान करत आहेत. टीमसोबत पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसलदेखील उपस्थित आहेत. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेला पाकिस्तानकडून विरोध केला जाणार आहे.
या प्रकरणाचे 10 पॉइंट्स जाणून घ्या....1) पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गुप्तहेर आणि दहशतवादीच्या आरोपाखाली बंद कॅमेऱ्या सुनावणी केली. त्यानंतर एप्रिल 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.2) भारताने पाकिस्तानवर दबाव टाकत गुन्हा कबूल करण्यास विरोध दर्शवत त्याचवर्षी 8 मे रोजी आयसीजेमध्ये याचिका दाखल केली.3) आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानने सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांच्या मृत्यदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली.4) पाकिस्तानच्या मीडियाने दावा केला की, आंतरराष्ट्रीय न्यायालय कुलभूषण जाधव यांची शिक्षा रद्द करुन त्यांना राजनैतिक स्तरावर आदेश देऊ शकते. 5) कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय काय निर्णय घेईल, याबाबत काहीच अंदाज नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते.6) पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. 7) आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या 10 सदस्यीय खंडपीठाने 10 मे 2017 रोजी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. 8) आंतरराष्ट्रीय न्यायालयात याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात चार दिवस सुनावणी सुरु होती, यावेळी भारत आणि पाकिस्तानने आपले म्हणणे मांडले होते. 9) भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांची शिक्षा रद्द करण्याची आणि त्यांची लवकरात लवकर सुटका करण्याची विनंती केली आहे. 10) भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात सांगितले की, कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले. ज्यावेळी ते व्यापाराच्या उद्देशाने त्याठिकाणी गेले होते.