नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. यातच कोरोनावर मात करण्यासाठी काम करत असलेल्या आयसीएमआरने सर्व राज्यांना एक सर्व्हे करण्यास सांगितले आहे. सामान्य लोकसंख्या आणि उच्च धोका असलेल्या लोकसंख्येमध्ये किती प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे, याची माहिती घेण्यासाठी IgG ELISA टेस्टच्या माध्यमातून सीरो सर्व्हे (sero-survey) करण्याचा सल्ला आयसीएमआरने राज्यांना दिल्या आहेत.
आयसीएमआरने IgG ELISA टेस्ट किट विकसित केले आहे. तसेच, आयसीएमआरने हे प्रशिक्षण अनेक कंपन्यांना दिले आहे, कारण मोठ्या प्रमाणात IgG ELISA टेस्ट किट तयार केल्या जाऊ शकतील. IgG ELISA टेस्ट किटच्या माध्यमातून समजेल की, कोणत्या लोकांमध्ये IgG अँटीबॉडी तयार आहे. तसेच, यामुळे कळेल की, किती लोकांना कोरोनाची लागण झाली होती.
विशेष म्हणजे, या टेस्टमुळे ज्या लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, आता त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत, हे सुद्धा समजणार आहे. अँटीबॉडी टेस्ट आजारी पडल्यानंतर पाच ते सात दिवसानंतर करणे योग्य आहे. कारण, आजारी पडल्यानंतर अँटीबॉडी तयार होण्यास सुरुवात होते. सीरो सर्वेक्षणाच्या मदतीने लोकांच्या आरोग्याविषयीची योग्य प्रकारे माहिती मिळेल. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी पुढील प्लॅन तयार करता येऊ शकतो, असे आयसीएमआरने म्हटले आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत 1,83,143 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एकूण 5,164 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता, सरकारने देशात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.