ICMR Chief epidemiologist on Coronavirus : कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनमुळे (omicron variant) सध्या देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही देशांनी नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, डॉ. समीरन पांडा यांनी सतर्क राहणं आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
"जगात कोणत्याही प्रकारची महासाथ येते तेव्हा विशेषकरून विषाणू हहा त्याचं स्वरूप बदलत असतो. कोरोना विषाणूच्या बाबतीतही अगदी तिच स्थिती आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये याचे आणखीही म्युटेंट समोर येतील. यामुळेच आपल्याला घाबरण्याचं कारण नाही, आपल्याला यापासून बचाव करायचा आहे," असं पांडा म्हणाले. अमर उजालाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर वक्तव्य केलं. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सर्वात चांगला आणि उत्तम उपाय म्हणजे त्यासाठी ज्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्यात, त्याचं पालन करणं हाच आहे. लसीकरण, मास्कचा वापर, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, हात धुणं, सॅनिटायझरचा वापर अशा गोष्टींचा वापर केला पाहिजे. जर अशा गोष्टींचा दिनचर्येत वापर केला तर केवळ कोरोना विषाणूच नाही, तर अन्य गोष्टींपासूनही बचाव होईल. कोणत्याही गोष्टींना घाबरण्यापेक्षा त्याच्यापासून बचावासाठी असलेल्या उपायांचा वापरच उत्तम ठरणार असल्याचं ते म्हणाले.
सतर्क राहण्याची गरज"जगातील निरनिराळ्या देशांमध्ये कोरोना विषाणूचं बदलतं रुप समोर येत आहे. विशेषकरून ज्यांचा प्रसार अचानक तेजीनं होतो किंवा जे अधिक गंभीर आहेत. त्याच्यापासून निश्चितच आपल्याला अलर्ट राहायला हवं, त्या दिशेनं केंद्रानं अॅडव्हायझरीच्या रुपात पाऊल उचललं आहे. आपल्याला या प्रकरणी अलर्ट राहण्याची गरज आहे," असं डॉ. पांडा म्हणाले. राज्यांमध्ये ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि सँपलिंग सातत्यानं करत राहावं, यासंदर्भात राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे आपण योग्य दिशेनं न केवळ प्रकरणांची तपासणी करू शकतो, तर यामुळे आपल्या संसर्गही रोखता येईल. परंतु सध्या महासाथ वाढण्याच्या दृष्टीनं आपल्या देशात कोणतेही संकेत मिळाले नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.