कोलकाता : हत्तींची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना कठोर संदेश देण्याकरिता केनियाच्या धर्तीवर भारतातही हस्तिदंत नष्ट करण्याची तरतूद करण्याचा विशेषज्ञ विचार करीत आहेत. अलीकडेच केनियामध्ये १०५ टन हस्तिदंतांचा साठा जाळून नष्ट करण्यात आला होता. हत्ती प्रकल्पाचे संचालक आर.के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘आम्ही राज्याच्या वनविभागाला माध्यमांच्या उपस्थितीत हस्तिदंत सार्वजनिकपणे जाळण्यास सांगितले आहे. देशातील काही राज्यांनी या दिशेने पाऊल उचलले आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकचे मुख्य वन्यजीव संरक्षक एम.बी. होसमत म्हणाले की, ‘त्यांनी राज्यात जप्त करण्यात आलेले हस्तिदंत नष्ट करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. राज्यात प्रथमच हस्तिदंत जाळले जातील, परंतु हा प्रस्ताव अजूनही प्राथमिक टप्प्यात असून, लागू होण्यास वेळ लागेल.’ भारतात सर्वाधिक हस्तिदंत कर्नाटकात असण्याचा अंदाज आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडू, केरळ आणि ओडिशाचा क्रमांक येतो. कारण या राज्यांमध्ये फार मोठ्या संख्येत हत्ती आहेत. (वृत्तसंस्था)
भारतातील हस्तिदंताचा साठा जाळून नष्ट करण्याचा विचार
By admin | Published: May 11, 2016 3:26 AM