गुरूग्राम- एका छोट्याश्या कल्पनेने पेशाने इंजिनिअर असलेल्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. जिल्हा मत्स्य विभागात मत्स्य पालनाची माहिती घेण्यासाठी विनोद नावाची व्यक्ती गेली होती. पण विनोदकडे असलेल्या कमी जमिनीमुळे तेथे मत्स्य पालन करता येणार नसल्याचं त्यांना सांगितलं. पण त्याच जागेवर मत्स्य पालन न करता मोती उगवता येतील, असंही विनोदला सांगण्यात आलं. मत्स्य विभागातील त्या व्यक्तीने दिलेली कल्पना विनोदला आवडली. विनोदने लगेचच इंजिनिअरची नोकरी सोडली. आणि मोती उगविण्याची ट्रेनिंग सुरू केली. त्यासाठी तो भुवनेश्वरमध्ये गेला. आज विनोद गुरूग्राममध्ये मोतीच्या शेतातून लाखो रूपये कमावतो आहे. तसंच इतर शेतकऱ्यांनासुद्धा ट्रेनिंग देतो आहे. हरियाणामध्ये मोतीची शेती सुरू करणारे विनोद हे पहिले शेतकरी असल्याचं बोललं जात आहे. नवभारत टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
2016 साली विनोद कुमार हे त्यांचे काका सुरेश कुमार यांच्याबरोबर जिल्हा मत्स्य विभागात मत्स्य पालनासंदर्भातील माहिती घेण्यासाठी पोहचले. तेव्हा त्यांच्याकडे 20 फूट लांब व 20 फूट रूंद असलेल्या जमिनीचा तुकडा होता. तेवढ्या जमिनीवर ते मत्स्य पालन करू शकत नव्हते. त्यावेळी जिल्ह्या मत्स्य अधिकारी धर्मेंद्र सिंह यांनी विनोद यांना मोत्यांची शेती करण्याची कल्पना दिली. विनोदने भुवनेश्वरमधील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर अॅक्वा कल्चरमध्ये ट्रेनिंग केल्यानंतर जमालपूरमध्ये मोतींची शेती सुरू केली. विनोद यांनी आता इतर शेतकऱ्यांनाही याबद्दलची माहिती देण्यासा सुरूवात केली आहे.