नवी दिल्ली -मध्यप्रदेशात कमलनाथ सरकारने काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या आमदारांची अनेक दिवसांची मागणी मान्य करत राज्यात तीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यास मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे आमदारांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे.
कमलनाथ सरकारच्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला आहे. नवीन जिल्हा निर्मितीच्या सरकारच्या निर्णयात चाचौडा, नागदा आणि मेहर या शहरांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंडखोर आमदार नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी आग्रही होती. भाजपवर नाराज असलेले आमदार नारायण त्रिपाठी गेल्या अनेक वर्षांपासून मेहरला (सतना) ला जिल्हा बनविण्यासाठी आग्रही होते. मतदार संघात जे विकासावर बोलतील त्याच्यासोबतच राहु अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
या व्यतिरिक्त दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह हे चौपाडा (गुना) शहराला जिल्हा करण्याची मागणी करत होते. या मुद्दावरून त्यांनी काँग्रेसला अनेकदा घरचा आहेर दिला होता. तर नागदाला (उज्जेन) जिल्हा बनवून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिलीप सिंह गुर्जर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे किती आमदार काँग्रेसमध्ये परत येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तब्बल 22 आमदारांनी राजीनामा देत बंगळुरू गाठल्यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार अल्पमतात गेले आहे. त्यातच राज्यपालांनी तातडीने फ्लोरटेस्ट घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आता काय निर्णय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र कमलनाथ यांनी देखील प्लॅन बी कायम ठेवला आहे.