नवी दिल्ली : सौदी अरबस्तानात घरकाम करण्याऱ्या मोलकरणीच्या नोकरीसाठी जाणाऱ्या स्त्रियांची लैंगिक पिळवणूक, शारीरिक व मानसिक छळ आणि हात तोडण्यासारख्या घटना वरचेवर घडू लागल्याने यापुढे भारतीय महिलांना त्या देशात मोलकरणी म्हणून पाठविण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार भारत सरकार करीत आहे.सौदीसह मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये चांगला पगार देऊनही घरकाम करणे, मुले सांभाळणे अशा कामांसाठी स्थानिक कामगार मिळत नसल्याने भारतातून हजारो मोलकरणी तेथे जाऊन नोकऱ्या करीत आहेत. अशाच प्रकारे मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातून गेलेल्या कस्तुरी मुनीरत्नम हिचा हात तिच्या सौदी मालकाने तोडल्याची धक्कादायक ताजी घटना उघड झाल्यानंतर अशा प्रकारे बंदी घालण्याच्या विचाराने जोर पकडला आहे.भारताने या घटनेचा ‘अस्वीकारार्ह’ असे म्हणून धिक्कार केला असून रियादमधील भारतीय वकिलातीने सौदी परराष्ट्र मंत्रालयाकडे हा विषय नेटाने लावून धरावा, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले आहे. कस्तुरीचा हात तोडणाऱ्या तिच्या मालकाला कडक शासन करण्याची मागणी रियादमधील भारतीय वकिलातीने सौदी सरकारकडे केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.गुरुवारी विदेशस्थ भारतीय बाबींचे मंत्रालय व परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी संलग्न संसदीय सल्लागार समितीची बैठक झाली तेव्हा भारतीय मोलकरणींना सौदीत पाठविणे पूर्णपणे बंद करण्याच्या विषयावर स्वराज चर्चा यांनी केली. समितीचे एक सदस्य डी. राजा यांनी सांगितले की, सौदी अरबस्तानात जाणाऱ्या मोलकरणींमध्ये तामिळनाडूच्या वेल्लोर व आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी या जिल्ह्यांमधील महिलांची संख्या सर्वाधिक आहे. सौदीमध्ये जाणाऱ्या भारतीय मोलकरणींचा हा ओघ कसा थांबवावा यावर समितीत चर्चा झाली. बंदी घातली तरी भारतातील लालची एजंटांकडूनच त्याचे उल्लंघन होणार नाही यासाठी काय करता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोलकरणी पाठविणे बंद करण्याचा विचार
By admin | Published: October 11, 2015 3:35 AM