ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - भारतातील संसदीय पद्धतीचा अभ्यासासाठी आलेल्या भूटानच्या शिष्टमंडळासमोरही खासदारांनी गोंधळ घातल्याने नाराजी व्यक्त होत आहे. एखाद्या राष्ट्राचे खासदार संसदेचे कामकाज बघण्यासाठी आले असताना अशा प्रकारे गोंधळ घालून आपण त्यांच्यासमोर नेमका कसला आदर्श ठेवतोय असा सवाल आता उपस्थित होत आहे.
भूटानमधील खासदारांचे एक शिष्टमंडळ सध्या भारत दौ-यावर असून भूटाननेही नुकताच लोकशाही पद्धतीचा अवलंब केला आहे. भारतीय संसद कशी चालते याचा अभ्यास करण्यासाठी हे शिष्टमंडळ मंगळवारी राज्यसभेत उपस्थित होते. कामकाज सुरु होण्यापूर्वी राज्यसभा अध्यक्षांनी सर्व खासदारांना भूटानच्या शिष्टमंडळाची ओळख करुन दिली व त्यांच्यासमोर तरी नीट कामकाज चालू द्यावे असे आवाहन खासदारांना केले. संसदीय कामाकाजाबद्दल त्यांना शिकता येईल असा उल्लेख उपराष्ट्रपतींनी करताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.
उपराष्ट्रपतींच्या विनंतीकडे सर्वपक्षीय खासदारांनी दुर्लक्ष केले व कामकाज सुरु होताच गोंधळाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनीटांमध्येच कामकाज तहकूब करावे लागल्याने भूटानमधून आलेले शिष्टमंडळही चक्रावून गेले असावे. आम्ही संसदीय कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी संसदेत आले होतो, पण सभागृह काही वेळेतच तहकूब झाली अशी प्रतिक्रिया भूटानच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी दिली.