नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर एका व्यक्तीनं दुपारच्या सुमारास गोळीबार केला. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतानाही गोळीबार झाल्यानं विरोधकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या सभेत झालेल्या प्रक्षोभक घोषणांमुळेच जामिया परिसरात हिंसाचार झाल्याचा आरोप एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी केला आहे. 'अनुराग ठाकूर आणि रात्री ९ वाजता टीव्हीवर झळकणाऱ्या सर्व राष्ट्रवादी मंडळींचे आभार. या मंडळींनी देशात इतका द्वेष निर्माण केला आहे की एक दहशतवादी पोलिसांसमोर विद्यार्थ्यावर गोळी झाडत आहे,' अशा शब्दांत ओवेसींनी भाजपावर निशाणा साधला आहे. मोदींनी गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कपड्यांवरुन ओळखावं, असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे. 'सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना, हिंसक झालेल्यांना कपड्यांवरुन ओळखता येतं,' असं मोदींनी १५ डिसेंबर रोजी झारखंडमधल्या दुमकामध्ये प्रचारादरम्यान म्हटलं होतं. त्यावरुन ओवेसींनी मोदींना लक्ष्य केलं आहे. असदुद्दीन ओवेसींनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. जामिया विद्यापीठात गेल्या महिन्यात शौर्य दाखवणाऱ्या पोलिसांना आता नेमकं काय झालंय?, असा सवाल ओवेसींनी विचारला आहे. बघ्याची भूमिका पार पाडण्यासाठी एखादा पुरस्कार असल्यास दिल्ली पोलीस कायम तो जिंकतील, अशा शब्दांत ओवेसींनी पोलिसांची खिल्ली उडवली. ओवेसींनी गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा फोटोदेखील ट्विट केला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला बॅरिकेडवर चढून का जावं लागतं? तुमच्या सेवेचे नियम तुम्हाला माणूस होण्यापासून रोखतात का?, असे प्रश्न ओवेसींनी विचारले आहेत.