दिनकर रायकर, मुंबई स्वार्थ हा माणसाला आंधळे करतो आणि राजकीय स्वार्थ बेधुंद..! त्याचेच जागते उदाहरण आज महाराष्ट्राला पाहावयास मिळाले. केवळ मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच असावे या हट्टापोटी शिवसेनेने २५ वर्षांचा घरोबा मोडला. सत्तेचा सोपान अवघ्या काही पावलांवर आलेला दिसत असताना त्यांना हे ‘शहाणपण’ सुचले आणि त्यांनी स्वत:च्या हाताने पायावर धोंडा पाडून घेतला. परिणामी महायुतीतून शिवसेनेने स्वत:लाच हद्दपार करून घेतले आहे. शिवसेना-भाजपा एकत्र लढू नयेत यासाठी पडद्याआड राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली खेळीदेखील यानिमित्ताने यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.ज्याचे आमदार जास्त निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल हा साधा न्यायपूर्ण मार्ग जर शिवसेनेने स्वीकारला असता तर आज महायुतीच्या उमेदवारांना फारसा प्रचारही न करता सत्ता काबीज करता आली असती. युतीच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात शिवसेना हा मोठा व भाजपा लहान भाऊ असे अलिखित ठरले होते. त्याचा फायदा शिवसेनेला झाला आणि १९९५ साली मुख्यमंत्रिपदही त्यांना मिळाले होते. राजकारण हे कायम दोन अधिक दोन चार अशा सरळ गणिताने चालत नाही. त्याचे कधी पाचही होतात तर कधी तीनही करावे लागतात. हे राजकीय कटू सत्य न मानता शिवसेना आपल्याच हेक्यावर कायम राहिली आणि बाळासाहेब ठाकरे-प्रमोद महाजन यांनी अनेक वर्षे देवाणघेवाण करत टिकवलेल्या संसाराचे संचित त्यांच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंना टिकवता आले नाही. हे खरे की शिवसेना ही महाराष्ट्रात तळागाळात पोहोचलेली आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपाची राज्यात ताकद वाढवली. याच मोदी लाटेचा फायदा शिवसेनेलाही झाला. त्याच ताकदीच्या जोरावर महाराष्ट्रातील सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकणे त्यांना शक्य होणार होते. मात्र तडजोडच न करण्याच्या टोकाच्या भूमिकेमुळे एरवी हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास मिळविण्यासाठीही आता या सर्वांना प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. महायुतीतील अन्य घटक पक्ष भाजपासोबत गेले हे भाजपाची ताकद वाढल्याचे द्योतक आहे. युती तुटली असे विधान भाजपाच्या एकाही नेत्याने केले नाही. ‘आम्ही आता आमच्या मार्गाने जाऊ, जाताना शिवसेनेवर कोणीही टीका करणार नाही’ असा संयमी पवित्राही भाजपा अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली आहे. मैत्री कधीही संपत नाही हे सांगायलाही ते विसरले नाहीत. याचा अर्थ निवडणुकीनंतर पुन्हा हे असेच वेगळे राहतील असेही नाही. दोघांचेही लक्ष्य राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचे आहे. त्यामुळे उद्याचे राजकारण आजच्या कटुतेवर अवलंबून राहणार नाही. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रात कमी लेखले जात आहे अशी भावना शिवसेनेला वाटत होती त्यातूनच त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. महायुतीतील वेगाने बदलत चाललेल्या घडामोडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत होतील असे वाटत होते. परंतु राष्ट्रवादीनेही काँग्रेसकडून जास्त जागा मिळत नाहीत असे सांगत पंधरा वर्षाचा सत्तेचा संसार मोडून टाकला आहे. असे स्वार्थी राजकारण गेल्या काही दिवसांपासून होत असताना जनतेला कायम गृहीत धरण्याचे काम सर्व पक्षांनी केले आहे. सर्वच पक्ष भांडत असताना कोणीतरी राज्याविषयी बोलायला हवे असे म्हणत मनसेने आजच या गदारोळात उडी मारत स्वतंत्र चूल मांडली. या सगळ्यात ज्यांच्यासाठी नवे सरकार येणार आहे त्या महाराष्ट्राला व जनतेला आम्ही काय देणार आहोत, त्यांचे प्रश्न कसे सोडवणार आहोत याविषयी कोणी बोलताना दिसत नाही. आता मतदार याकडे कसे पहात आहेत हे १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मतदानातून दिसून येईल.
सत्तेसाठी सर्वांची वैचारिक तिलांजली
By admin | Published: September 26, 2014 3:34 AM