नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला 350 हून अधिक जागा मिळाल्याने देशात पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत दारुण पराभव सहन करावा लागला. देशात आज महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या विचारधारेचा विजय झाला आहे. गांधी विचार देशात हरले ही देशासाठी चिंतेची बाब आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी दिली आहे.
भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार प्रज्ञा सिंह यांनी दिग्विजय सिंह यांचा पराभव करत विजय प्राप्त केला आहे. भोपाळच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवत दिग्विजय सिंहांचा लाखो मतांनी पराभव केला. भोपाळमधील विजय हा मोदींच्या विश्वासाचा विजय आहे. त्यांनी सामान्य लोकांसाठी जी कामे केली त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे असं प्रज्ञा सिंह यांनी सांगितले.
प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाच्या अडचणी वाढल्या होत्या. प्रज्ञा सिंह यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी या विधानावरून भाजपावर चौफेर टीका झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना प्रज्ञा यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना मनाने कधीच माफ करू शकणार नाही असं म्हटलं होतं.
भोपाळ हा भाजपाचा गड असून प्रज्ञा यांच्या उमेदवारीचे पंतप्रधान मोदींपासून वरिष्ठ नेत्यांनी समर्थन केले होते. प्रज्ञा ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरें यांच्याबद्दल त्यांनी सुरुवातीलाच वादग्रस्त वक्तव्य केले होते. नंतर त्यांना माफी मागावी लागली होती.
गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भोपाळ मतदारसंघातून पहिल्या फेरीपासून प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मताधिक्य घेतलं होतं. प्रज्ञा सिंह यांना 8 लाख 65 हजार 212 मते पडली तर काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांना 5 लाख 1 हजार 279 मते पडली. तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी प्रज्ञा सिंह यांनी दिग्विजय सिंह यांचा पराभव केला.