बंगळुरू, दि. 4- गुजरात राज्यसभेत 8 ऑगस्टला होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गळती रोखण्यासाठी गुजरात काँग्रेसच्या 44 आमदारांना बंगळुरूतील रिसॉर्टमध्ये पाठविण्यात आलं. गेल्या आठवड्यात शनिवारी बंगळुरूत गेलेले काँग्रेस आमदार रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 7 ऑगस्टला परत येण्याची चर्चा सुरू आहे. बंगळुरूतील रिसॉर्टमध्ये या आमदारांसाठी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सगळ्या सोयी असताना या आमदारांनी आता नवी मागणी पक्षाकडे केली आहे. बंगळुरूत त्यांना साऊथ इंडियन पदार्थ खावे लागत आहेत. त्या पदार्थांना कंटाळलेल्या गुजरातच्या आमदारांनी आता गुजराती शेफची मागणी केली आहे. रिसॉर्टमध्ये गुजराती पदार्थ बनविण्यासाठी गुजराती शेफ असावा, अशी मागणी या आमदारांनी केली आहे.
हिंदूस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, गुजरातच्या 44 आमदारांनी आपल्या तात्पुरत्या निवासस्थानी असलेल्या साऊथ इंडियन खाद्यपदार्थांबद्दल असंतोष काँग्रेसच्या हाय कमांडकडे व्यक्त केला आहे आणि गुजराती शेफ उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. रिसॉर्टमधील सगळं नियोजन उत्तम आहे. पण खाद्यपदार्थांमध्ये बदलही तितकेच गरजेचे आहेत, असं मत या आमदारांनी व्यक्त केल्याचं समजतं आहे. तिखट पदार्थ न खाणारे गुजराती आमदार जे जास्त करून चपाती, डाळ, कढी या पदार्थांवर अवलंबून असतात, त्यांना इथे सगळ्यात जास्त त्रास होतो आहे, असं एका आमदाराने म्हंटलं आहे.
गुजराती लोकांच्या दररोजच्या नाश्त्यामध्ये भाकरी आणि ठेपला या पदार्थांचा समावेश असतो. पण आता बंगळुरूपासून 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या 'इग्लटन-द गोल्फ विलेज' या रिसॉर्टमध्ये त्यांना सकाळच्या नाश्त्यामध्ये इडली आणि डोसा खावा लागतो आहे. तर दुपारच्या जेवणात भात किंवा रागी बॉल्सचा जास्त समावेश आहे.
बंगळुरूत असलेल्या या 44 आमदारांचं जेवण बनविण्यासाठी लवकरच तिथे गुजराती शेफ उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं, कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितलं आहे.
गुजरातमध्ये 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदरांना भाजपच्या शिकारीपासून वाचविण्यासाठी गेल्या आठवड्यात बंगळुरूत रवाना करण्यात आलं होतं. गुजरातमध्ये एकुण 57 काँग्रेसचे आमदार होते त्यापैकी सहा जणांनी पक्षाला राजीनामा दिला. तर त्या सहापैकी तीन जणांनी भाजपाची वाट धरली आहे.