विमानात सोबतच्या प्रवाशांवर लघुशंका केली तर कारवाई आणि ट्रेनमध्ये हाच प्रकार घडला तर त्याला आरपीएफने सामान्य तक्रार दाखल करून सोडून दिले आहे. रेल्वेच्या या दुटप्पीपणावर पीडित वैज्ञानिक आणि त्याच्या पत्नीने ही कसली कारवाई, असा आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेशमध्ये हा प्रकार घडला आहे.
गेल्या काही काळापासून असे प्रकार विमानांमध्ये घडत आहेत. परंतू, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. तर ट्रेनमध्ये वृद्ध दाम्पत्यावर लघुशंका करणाऱ्यास आरपीएफने घरी पाठविले आहे. झाशीजवळ संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये बुधवारी ही घटना घडली आहे.
वाराणसी हिंदू विद्यापीठातून निवृत्त झालेले वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. जी एन खरे यांच्या आणि त्यांची पत्नी ऊषा खरे यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांच्या सीटच्या शेजारी बसून दिल्लीचा राहणारा रितेश हा प्रवास करत होता. त्याने प्रवासात दारुही प्राशन केली.
खरे यांनी त्याला यावरून विचारले असता त्याने त्यांना धुडकावून लावले. या वादातून त्याने खरे आणि त्यांच्या पत्नीवर लघुशंका केली. यावरून गोंधळ झाल्याने त्यांनी कंट्रोल रुमला याची माहिती दिली. झाशी स्थानकावर ट्रेन आल्यावर रितेशला ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आले. रेल्वे कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला जामीन देत सोडून देण्यात आले.
वारंवार रोखल्यानंतरही हा विकृत तरुण खरे व त्यांच्या पत्नीवर लघवी करत असल्याचे खरे यांनी सांगितले. लाईट लावूनही तो थांबला नाही. महिलेसमोर नग्नावस्थेत उभे राहून असे घाणेरडे कृत्य करत असल्याचे सांगूनही पोलिसांनी त्याला सोडून दिल्याने वाईट वाटत आहे, असे खरे म्हणाले. हा मोठा गुन्हा आहे. यामध्ये तरुणाची किमान तुरुंगात रवानगी व्हायला हवी होती, अशी अपेक्षा खरे यांनी व्यक्त केली आहे.