"आप-काँग्रेसमध्ये आघाडी झाली असती तर निकाल बदलला असता…", AAP नेत्याचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 12:42 PM2024-10-08T12:42:32+5:302024-10-08T12:44:53+5:30
Haryana Assembly Election Result 2024: निवडणूक निकालाबाबत आप नेते सुशील गुप्ता यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Haryana Assembly Election Result 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. सध्या मतमोजणी सुरू आहे. सध्याचे निकाल पाहता हरयाणात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. मात्र, या निवडणुकीत आम आदमी पक्षही (आप) रिंगणात आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आप आणि काँग्रेसची आघाडी होऊ शकते, असं निवडणूकीपूर्वी म्हटलं जात होतं, परंतु तसं झालं नाही. दरम्यान, निवडणूक निकालाबाबत आप नेते सुशील गुप्ता यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
हरयाणात काँग्रेस पक्षाचा पराभव झाला तर तुम्ही किंगमेकर व्हाल, या निर्णायक भूमिकेत तुम्ही स्वतःला पाहता का? असं सुशील गुप्ता यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, याबाबत आकलन करणं माझं काम नाही. दोन्ही पक्षांचे हायकमांड यासंबंधी काय फायदे-तोटे झाले, याचे आकलन करतील. काय व्हायला हवे होते आणि काय व्हायला नको होते. आम्ही सकारात्मक विचार करून हरयाणाची निवडणूक सकारात्मक राजकारणानं लढवली होती, असं सुशील गुप्ता म्हणाले.
हरयाणात काँग्रेस पक्षाचा पराभव झाला तर तुम्ही किंगमेकर व्हाल, या निर्णायक भूमिकेत तुम्ही स्वतःला पाहता का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की या प्रकरणाचे मूल्यांकन करणे माझे काम नाही. दोन्ही पक्षांचे हायकमांड त्याचे काय फायदे-तोटे झाले, याचे आकलन करतील. काय व्हायला हवे होते आणि काय व्हायला नको होते. आम्ही सकारात्मक विचार करून हरियाणाची निवडणूक सकारात्मक राजकारणाने लढवली होती.
याचबरोबर, आप आणि काँग्रेसची आघाडीच्या मुद्द्यावरही सुशील गुप्ता यांनी भाष्य केलं. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राष्ट्रीय स्तरावर आघाडी झाली, तर भाजपची अडचण झाली, इथंही असं झालं असतं तर निकाल खूप बदलला असता, असं सुशील गुप्ता म्हणाले. दरम्यान, हरयाणात सध्या भाजप आणि काँग्रेस यांच्यात कडवी लढत सुरू आहे. हे पाहता यावेळी भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जनतेचा निर्णय आम्हाला मान्य असेल -सुशील गुप्ता
आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाला तुरुंगात डांबण्यात आले. निवडणूक लढवण्यासाठी आमच्याकडे एक रुपयाही नव्हता. मी आधीही म्हटलं होतं की, आमचा प्रत्येक कार्यकर्ता पाणी पिऊन आणि हरभरा खाऊन काम करतो. आमच्याकडे कोणतंही साधन नव्हतं परंतु आम्ही मोठ्या संसाधनांसह या लोकांसोबत लढलो. आम्ही निवडणूक अतिशय सुंदरपणे लढवली आणि आता जनतेचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असंही सुशील गुप्ता म्हणाले.
भाजप हॅट्ट्रिकसह गुलाल उधळणार?
हरयाणामध्ये गेल्या १० वर्षापासून भाजप सत्तेवर आहे. या निवडणुकीच्या निकालाचे आतापर्यंतचे आकडे पाहात भाजप हरयाणा विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रीक करताना दिसत आहे. अर्थात येथे भाजप विजयी झाल्यास हॅट्रिकसह गुलाल उधळेल.