नवी दिल्ली : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. यानंतर संतापलेल्या पाकिस्ताने भारताविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. त्याला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सूचक वक्तव्य केले आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानात घुसून दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेनला मारले जाऊ शकते, तर काहीही होऊ शकते. भारतही अशा प्रकराची कारवाई करु शकतो, असे पाकिस्तानला उद्देशून अरुण जेटली म्हणाले. याचबरोबर, दहशतवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई केली, तर ती योग्यच असते. हे अमेरिकेने दाखवले आणि त्याला जगामध्ये कोणीही विरोध केला नाही, असेही अरुण जेटली यांनी सांगितले.
दरम्यान, पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.