झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. दोन टप्प्यात मतदान होणार असून आता प्रचारसभा सुरू आहेत, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासींच्या घटत्या लोकसंख्येचा संदर्भ देत मोठी घोषणा केली.
अमित शाह म्हणाले, आदिवासींची लोकसंख्या कमी होत आहे, तर घुसखोर वाढत आहेत. भाजपचे सरकार आल्यास आम्ही घुसखोरी पूर्णपणे संपवू, अशी घोषणा अमित शाह यांनी केली. आम्ही असा कायदा आणू जिथे एखाद्या घुसखोराने आदिवासी महिलेशी लग्न केले तरी त्या महिलेची जमीन त्याला हस्तांतरित केली जाणार नाही, असंही शाह म्हणाले.
अमित शहा यांनी झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे स्टार प्रचारक हेमंत सोरेन यांच्यावरही निशाणा साधला. चंपाई सोरेन यांना ज्या प्रकारे अपमानित करून मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले ते योग्य नाही, असे अमित शहा म्हणाले. हा केवळ त्यांचाच नाही तर संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान आहे, असंही शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले, “चंपाई सोरेन इतकी वर्षे एकनिष्ठ आहेत, हेमंतजींच्या पाठीशी उभे आहेत, पण ज्या प्रकारे त्यांचा अपमान केला, तो फक्त चंपाई सोरेन यांचा अपमान नाही तर संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान आहे .
अमित शहा यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला कोंडीत पकडले. शाह म्हणाले, काँग्रेस नेत्याच्या घरातून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. माजी मंत्री आलमगीर आलम यांचा उल्लेख करत ते म्हणाले, त्यांच्या घरातून ३० कोटी रुपये आणि २७ नोट मोजण्याचे मशीन जप्त करण्यात आले.
जेएमएम-काँग्रेस-आरजेडीवर घोटाळ्यांचे आरोप
शाह यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड सरकारवर नियमितपणे घोटाळे सुरू असल्याचा आरोप केला. त्यांनी मनरेगामध्ये १,००० कोटी रुपयांचा घोटाळा, ३०० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा, १,००० कोटी रुपयांचा खाण घोटाळा आणि हजारो कोटी रुपयांचा मद्य घोटाळा केला, असा आरोपही अमित शाह यांनी केला.