नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत आम आदमी पक्षाचे (आप) ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी मोठा दावा केला आहे. दिल्लीत आता विधानसभा निवडणुका झाल्या तर आप सर्व ७० जागा जिंकेल, असा दावा मनीष सिसोदिया यांनी केला. शनिवारी राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघातील पदयात्रा प्रचारादरम्यान मनीष सिसोदिया यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या प्रकरणावरून तुरुंगात टाकल्याचा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला.
शहराच्या विविध भागात आपल्या प्रचारादरम्यान मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मनीष सिसोदिया म्हणाले, "आता निवडणुका झाल्या तर आम आदमी पक्ष विधानसभेच्या सर्व ७० जागा जिंकेल आणि एकूण मतांपैकी ७० टक्के मते मिळवेल." दरम्यान, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ७० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आपला आपले खातेही उघडता आले नाही.
पुढे मनीष सिसोदिया म्हणाले की, "भाजपचे लोक आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहून नाराज होते. जेव्हा मी तरुंगातून बाहेर आलो, तेव्हा भाजपचे लोक म्हणत होते की, हे मनीष सिसोदिया हसत बाहेर आले आहेत. मी हसत बाहेर आलो, कारण मी काही चुकीचे केलेले नाही." याचबरोबर, मनीष सिसोदिया यांनी भाजपवर असा आरोप केला की, भाजपने महाराष्ट्र, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशसह अनेक सरकारे पाडली आणि त्यांच्या नेत्यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) पाठवून पक्ष फोडले, परंतु आप झुकला नाही. ही दिल्लीकरांची ताकद आहे. अरविंद केजरीवाल सुद्धा लवकरच आपल्यासोबत असतील.
मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात होते कैद!दरम्यान, दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी गेल्या १७ महिन्यांपासून तिहार तुरुंगात कैद असलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ऑगस्त महिन्याच्या सुरुवातीला जामीन मिळाला होता. जामिनाची प्रत मिळाल्यानंतर तिहार प्रशासनाने त्यांची सुटका केली आहे. यानंतर तुरुंगाबाहेर आपच्या मंत्र्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मनीष सिसोदिया यांचे जंगी स्वागत केले होते. दरम्यान, बाहेर येताच मनीष सिसोदियांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.