नवी दिल्ली : सीमेवर घुसखोरी करून जवानांचे शिरच्छेद करण्यासारख्या घटना घडल्यास भारताकडून ‘योग्य, तीव्र आणि तात्काळ’ प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा नवे लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी दिला. लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शुक्रवारी पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवली.चीफ आॅफ आर्मी स्टाफ म्हणून सलामी स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्यास भारताकडून योग्य प्रत्युत्तर दिले जाईल. ते तीव्र आणि तात्काळ असेल.’ गेल्या वर्षी पाकिस्तानी सैन्याद्वारे ८ जानेवारी रोजी पूंछ भागात नियंत्रण रेषेनजीक भारतीय जवान लान्स नायक हेमराज यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. याबाबत विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.माजी लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंह यांनी शिरच्छेदाच्या घटनेवर भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले होते. पाकिस्तानला उचित आणि तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले असून आम्ही बळाचा वापर केल्यास त्याचा निर्णय सामरिक धोरणात्मक पातळीवर घेतला जातो, असे ते म्हणाले.ती घटना रणनीतीस्तरावरील मोहीम होती. ती स्थानिक कमांडरनी पार पाडली. प्रमुखांचा याच्याशी काहीही संबंध नव्हता. बॉर्डर एरिया टीम्सअंतर्गत येणाऱ्या पाकिस्तानी विशेष दलाने हेमराजचे शिर छाटून लान्स नायक सुधाकरसिंहचा मृतदेह विच्छिन्न केला होता. भारताचे लष्करप्रमुखपदाची जबाबदारी सोपवून माझ्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल जन. सिंह यांनी भारत सरकारचे आभार मानले. मेअखेर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने जन. सुहाग यांना भारताचे नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरु केली होती; परंतु तेव्हा भाजपाने या प्रक्रियेला विरोध केला होता.संपुआ सरकारने केलेल्या नियुक्त्या नवीन सरकार कायम ठेवणार आहे, असे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भाजपाप्रणीत रालोआ सरकार सत्तेत आल्यानंतर स्पष्ट केले होते. माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीयमंत्री जन. व्ही. के. सिंग यांनीही जन. सुहाग यांच्या नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जवानांचे शिरच्छेद केल्यास चोख प्रत्युत्तर
By admin | Published: August 02, 2014 3:34 AM