गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांत सातत्यानं वाढ (Petrol Diesel Hike) सुरू आहे. देशातल्या काही शहरांत पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. तर अनेक शहरांत पेट्रोलचा दर शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. पेट्रोल, डिझेलवरील आकारले जाणारे कर कमी करण्यात यावेत अशी मागणी सातत्यानं केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची (Kerala Assembly Election 2021) रणधुमाळी सुरू असलेल्या केरळमधल्या भाजप नेत्यानं महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे.आम्ही सत्तेत आल्यास पेट्रोल, डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंतर्गत आणून त्याची किंमत ६० रुपये लीटरच्या खाली आणू, असं आश्वासन भाजप नेते कुम्मानम राजशेखरन यांनी दिलं आहे. 'केरळमध्ये भाजपचं सरकार आल्यास आम्ही पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणू,' असं राजशेखरन कोच्चीतल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली.केरळमधलं एलडीएफ सरकार पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या अंतर्गत का येत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इंधनावर कोणत्याही टप्प्यावर जीएसटी आकारता येणार नाही, असं विधान करणारे केरळचे मंत्री थॉमस आयझॅक यांचाही त्यांनी समाचार घेतला. 'जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींमुळे इंधन दरांमध्ये बदल होत असतात भाजप सत्तेत आल्यास आम्ही इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणू. त्यामुळे इंधन दर ६० रुपये प्रति लीटरच्या खाली येईल,' असं राजशेखरन यांनी सांगितलं.
Kerala Assembly Election 2021: ...तर पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणू, ६० रुपये लीटर दरानं देऊ; भाजप नेत्याची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 1:35 PM