नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव आता बदलण्यात आले आहे. मुघल गार्डनचे (Mughal Garden) नाव बदलून अमृत उद्यान (Amrit Udyan) असे ठेवण्यात आले आहे. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुघल गार्डनचे नामकरण करण्यात आले आहे. गार्डन फुलांच्या विशेष विविधतेसाठी ओळखली जाते.
गार्डनचे नामांतर केल्यानंतर "मुघलांची नावे आणि चिन्हे उपटून फेकून दिली पाहिजेत", असे पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी म्हणाले. दरम्यान, मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान करण्याच्या निर्णयाचे केवळ शुभेंदू अधिकारीच नव्हे, तर भाजपच्या अनेक नेत्यांनी स्वागत केले आणि ते ऐतिहासिक असल्याचे म्हटले.
विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी म्हणाले, "त्यांनी अनेक हिंदूंना मारले, अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. केवळ मुघल गार्डनच नाही तर संपूर्ण देशातून त्यांचे नाव हटवले पाहिजे." तसेच,"बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यास आठवडाभरात ब्रिटिश आणि मुघलांची नावे हटवली जातील", असे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी म्हणाले.
दुसरीकडे, त्रिपुरा निवडणुकीबाबत शुभेंदू अधिकारी म्हणाले की, त्रिपुरात टीएमसीची स्थिती गोव्यापेक्षा वाईट असेल. तेथे जे टीएमसी उमेदवार असतील, त्यांचे डिपॉझिट जप्त केले जाईल. तेथे लढत फक्त भाजप आणि सीपीएम-काँग्रेस आघाडीमध्येच होणार आहे. याचबरोबर, विरोधी पक्षांनी सरकारला नाव बदलण्याऐवजी नोकऱ्या देण्यावर आणि महागाई नियंत्रित करण्यावर भर द्यावा, असा सल्ला दिला.
राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित उद्यानाचे नामकरण अमृत उद्यान असे केल्याबद्दल माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचे आभार केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटद्वारे मानले आहेत. ते म्हणाले, हे नवीन नाव केवळ आणखी एका वसाहतवादी ओळखीचा अंत दर्शवत नाही, तर अमृत काळासाठी भारताच्या आकांक्षा देखील दर्शवते. याशिवाय, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अमृत उद्यानाच्या नवीन फलकाचा व्हिडिओ ट्विटवर शेअर करत स्वागत, स्वागत, स्वागत, असे म्हटले आहे.