Haryana Assembly election 2024 : जम्मू काश्मीरमध्ये तिकीट वाटपावरून भाजपमध्ये गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर हरयाणामध्येही भाजपसमोर तिकीट वाटपाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अनेक नेते इच्छुक असून, नेत्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरूवात केल्याचे दिसत आहे. हरियाणाचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नरबीर सिंह यांनी निवडणूक लढवण्याबद्दल भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक प्रयत्न करताना दिसत आहेत. जम्म काश्मीरमध्ये उमेदवारांची घोषणा करताना गोंधळ झाला होता. भाजपला काही उमेदवार बदलावे लागले. त्यामुळे हरियाणातील इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे.
नरबीर सिंह यांनी भाजपला काय दिला इशारा?
भाजपचे नेते नरबीर सिंह गुरुग्राममध्ये बोलताना म्हणाले की, "मी बादशाहपूरमधून निवडणूक लढवणार आहे. भाजपकडून तिकीट मिळाले, तर चांगले आहे. नाही मिळाले तर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवेन."
नरबीर सिंह पुढे म्हणाले की, "मी अपक्ष निवडणूक लढवणार नाही. भाजपमध्ये काही लोक माझ्या बाजूने आहेत, तर काही माझ्या विरोधात आहेत."
२०१९ मध्ये भाजपने कापले होते तिकीट
नरबीर सिंह हे हरियाणाचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिलेले आहेत. नरबीर सिंह 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर बादशाहपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आले होते. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने नरबीर सिंह यांचे तिकीट कापले होते. आता ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेस नेत्याचे नातेवाईक
राजकीय वर्तुळात असे बोलले जाते की, केंद्रीय मंत्री इंद्रजीत राव यांच्या सांगण्यावरून 2019 मध्ये नरबीर सिंह यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे नरबीर सिंह नाराज झाले होते. नरबीर सिंह यांचे काँग्रेससोबत चांगले संबंध आहेत. काँग्रेस नेते राव दान सिंह यांचे जवळचे नातेवाईक आहेत. नरबीर सिंह यांच्या मुलीचे लग्न राव दान सिंह यांच्या मुलासोबत झालेले आहे.