म्हैसूर - पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे कर्नाटकमधील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपा व जनता दल सेक्युलर या विरोधी पक्षांमध्ये कर्नाटकची निवडणुक जिंकण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यादरम्यान, कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला तर या राज्यात राहणे मला असुरक्षित वाटेल, अशी भीती प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी व्यक्त केले आहे. आपल्या राज्यातील भीती व्यक्त करताना प्रकाश राज म्हणले, गुलबर्गा येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्यावर आणि माझ्या कारवर दगडफेक झाली. अशा परिस्थितीत जर राज्यात भाजपाची सत्ता आली तर मी या राज्यात राहणे असुरक्षित समजेन. तसेच दिवसेंदिवस माझ्या मनातील भीती वाढत जात आहे." यावेळी भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या कल्पनेलाही प्रकाश राज यांनी विरोध केला. असे करणे म्हणजे कुठल्यातरी कावळ्याला राष्ट्रीय पक्षी बनवण्यासारखे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. "जर बहुसंख्याक असणे हाच निकष असेल आणि याच आधारावर हिंदुराष्ट्र बनवण्याची मागणी होत असेल तर या देशात मोरांपेक्षा कावळ्यांची संख्या अधिक आहे. त्याआधारावर मोराच्या जागी कावळ्यालाच राष्ट्रीय पक्षी घोषित करा, प्रकाश राज म्हणाले. केवळ बहुसंख्यकतेच्या आधारावर कुठल्याही समुहाला या राष्ट्राचे संपूर्ण प्रतिनिधी मानता येणार नाही, असेही ते म्हणाले. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते असलेले प्रकाश राज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे कट्टर विरोधक असून, मोदी आणि अमित शाह यांना आपण हिंदू मानत नाही, असे विधान त्यांनी जानेवारी महिन्यात केले होते. मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य करताना ते म्हणाले होते की, ते म्हणतात मी हिंदूविरोधी आहे, पण हे सत्य नाही, खरंतर मी मोदीविरोधी, हेगडेविरोधी आणि अमित शाहविरोधी आहे. ते हिंदू नाहीत.
कर्नाटकमध्ये भाजपा जिंकला तर मला असुरक्षित वाटेल - प्रकाश राज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 6:16 PM