ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - किंगफिशर एअरलाइन्स आणि विजय मल्ल्या यांच्या प्रकरणावरून अर्थखात्याने बोध घेतला आहे. जर कंपन्या कर्ज बुडवत असतील तर व्यक्तिगत हमीधारकांना पाचारण करा असा सल्ला अर्थखात्याने सरकारी बँकांना दिला असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.
कंपनीने कर्ज बुडवले तर व्यक्तिगत गॅरंटीधारकांची मालमत्ता विकून पैसे वसूल करण्याचा मार्ग फारच थोड्या प्रकरणात दिसून आला आहे. त्यामुळे एक सर्क्युलर काढून हा उपाय अमलात आणावा असे सरकारी बँकांना सांगण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. कंपन्यांना कर्ज देताना कंपनीच्या हमीबरोबरच तिच्या प्रवर्तकांकडून हमीपत्र लिहून घेण्याचा प्रघात आहे. अशा हमीदारांकडून कशाप्रकारे कर्जाची वसुली करता येईल याची यादीच अर्थखात्याने दिली आहे.
त्याचप्रमाणे, कर्ज घेणाऱ्या कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर सतत लक्ष ठेवावे असा सल्लाही केंद्रीय अर्थखात्याने बँकांना दिला आहे.