नवी दिल्ली - ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (डीटीआयडीसी) बसमध्ये हॉर्न वाजवणे आणि आवाज देऊन प्रवाशांना बोलवण्यावर दंड आकारला आहे. देशात पहिल्यांदाच ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी अशा प्रकारचं पाऊल उचलण्यात आलं आहे. डीटीआयडीसने दिलेल्या आदेशानुसार, बस स्थानकावर हॉर्न वाजवल्यास 500 रुपये दंड वसूल केला जाईल. तर कंडक्टरने प्रवाशांना बोलावण्यासाठी जोरजोराने आवाज दिला तर 100 रुपये दंड भरावा लागेल.
बस स्थानकांची निगा राखणा-या डीटीआयडीसीच्या कार्यकारी संचालकांनी 9 ऑक्टोबर रोजी हा आदेश जारी केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. आदेशात सांगितल्यानुसार, बस स्थानकांवरील ध्वनी प्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. बस अड्ड्यांवर वारंवार जोरजोरात हॉर्न वाजवणे आणि रोडवेज कंडक्टरकडून प्रवाशांना बोलावण्यासाठी ओरडून आवाज देणे ही ध्वनी प्रदूषणाची मुख्य कारणे असल्याचं समोर आलं आहे.
तपासादरम्यान डीटीआयडीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर के के दहिया यांना बस अड्ड्यांवरील ध्वनी प्रदूषणाची पातळी प्रमाणापेक्षा अधिक असल्याचं आढळलं. आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, 'कंडक्टरने जोराने आवाज दिल्यास 100 रुपये आणि बस अड्ड्यांवर हॉर्न वाजवल्यास 500 रुपयांचा दंड वसूल केला जाईल'.
नियमाचं उल्लंघन झाल्यास बस स्थानकातून बाहेर पडत असताना हा दंड आकारला जाईल. बस अड्ड्यांना यासंबंधी रोज रिपोर्ट सादर करणं अनिवार्य असणार आहे.
दिल्लीत हवा प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषणाची समस्याही गंभीर बनली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके विक्रीवर बंदी आणल्याने दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाल आहे. यावेळी फटाक्यांची संख्या कमी असेल, त्यामुळे प्रदूषणही कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवाळीत फक्त हवा नाही तर ध्वनी प्रदूषणातही तितकीच वाढ होते. दिवाळीनंतर लगेचच या समस्या जाणवायला सुरुवात होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांच्या आकडेवारीकडे पाहिलं, तर ध्वनी प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.