मंदसौर - ज्या दिवशी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, त्या दिवसापासून दहा दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल, असे वचन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदसौर येथे शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करताना दिले. मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या पहिल्या स्मृतिदिनी राहुल गांधी उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच शेतकऱ्यांना न्याय आणि कर्जमाफीसारख्या विषयांना हात घालत या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल फुंकले. मोठ्या उद्योगपतींचे लाखो करोड रुपयांचे कर्ज माफ होते. मात्र शेतकऱ्यांना एका रुपयाचीही माफी मिळत नाही, अशी टीका करत राहुल गांधींनी ज्या दिवशी राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, त्या दिवसापासून दहा दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे वचन दिले.शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी मंदसौर येथे झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच त्यांना आपले सरकार आल्यानंतर दहा दिवसांच्या आत न्याय मिळेल, असे आश्वासन दिले. शिवराज सरकारमध्ये शेतकऱ्यांना बाजारात चेक मिळतो आणि बँकेत त्यांच्याकडून लाच घेतली जाते. मात्र काँग्रेसचे सरकार आल्यावर त्यांना थेट बाजारातच पैसे दिले जातील. तसेच प्रत्येक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करून स्थानिकांना रोजगार दिला जाईल, असे राहुल गांधींनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना सत्तेवर येताना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकार बनल्यास शेतकऱ्यांना दहा दिवसांत देऊ कर्जमाफी, राहुल गांधींचे वचन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 4:25 PM