काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास ‘जीएसटी’च्या कररचनेत बदल करू - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 11:14 PM2017-11-03T23:14:29+5:302017-11-03T23:27:28+5:30
नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि पक्ष सत्तेत आल्यास जीएसटी कररचनेत बदल करू, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. जीएसटी कररचनेत बदल व्हावा, जर तुमची अशीच इच्छा असल्यास काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ती नक्कीच पूर्ण होईल, असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. ते सुरतमध्ये बोलत होते.
गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्राम सुरू आहे, त्यातील एका जाहीर सभेत त्यांनी हे विधान केलं आहे. राहुल गांधी व्यावसायिकांना उद्देशून म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष देशात सत्तेत आल्यास एक असा जीएसटी घेऊन येऊ, ज्यात नक्कीच तुमचा फायदा असेल. तुमच्या इच्छेनुसारच त्यात फेरबदल करू. तुमच्या म्हणण्याचा निश्चितच आम्ही सन्मान करू.
नोटाबंदीच्या निर्णयावरून यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. सर्वच पैसा हा काळा पैसा नाही, हे मोदींना अद्यापपर्यंत कळलं नाही. जो काळा पैसा नरेंद्र मोदी गरिबांच्या खिशात शोधतायत, तो काळा पैसा परदेशातल्या बँक खात्यांमध्ये सुरक्षितरीत्या जमा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही हवेतच विरलं आहे. वर्षभरात फक्त एक लाख नोक-याच तयार झाल्या आहेत. मोदींनी प्रत्येक वर्षी दोन कोटी नोक-या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरही पेट्रोलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट होऊनही भारतात पेट्रोल व डिझेल एवढं महाग का मिळतं, हेसुद्धा मला अद्यापपर्यंत समजलं नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे.