सत्तेत आलो तर राम मंदिरासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू; निवडणुकीआधी काँग्रेसचा 'राम'बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 07:45 PM2019-02-22T19:45:34+5:302019-02-22T19:59:06+5:30
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा राम राग
डेहराडून: काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं काँग्रेसचे महसचिव आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी म्हटलं. भाजपाराम मंदिराचं राजकारण करत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. भाजपाला फक्त फक्त नरेंद्र मोदीचं राष्ट्रवादी वाटतात, असंही रावत म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
'अयोध्या प्रकरणावर मी आधीदेखील बोललो आहे. आमचा पक्ष सत्तेत आल्यास राम मंदिर उभारणीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करु. हीच काँग्रेसची भावना आणि भूमिकादेखील आहे,' असं रावत म्हणाले. काँग्रेसनं सत्तेवर असताना दोनवेळा राम मंदिरासाठी गांभीर्यानं प्रयत्न केले. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही ही गोष्ट आपल्यासमोर स्वीकारली होती, असा दावा त्यांनी केला. भाजपा राम मंदिराच्या मुद्द्याचा केवळ राजकारणासाठी वापर करत असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन रावत यांनी भाजपावर टीका केली. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच राष्ट्रवादी आहेत असं भाजपाला वाटतं, असं रावत यांनी म्हटलं. 'फक्त मोदीच कसे काय राष्ट्रवादी असू शकतात. देशातील प्रत्येक व्यक्ती राष्ट्रवादी आहे. मी राष्ट्रवादी आहे, तुम्हीही राष्ट्रवादी आहात. देशातील जनता शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभी आहे,' असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तराखंड सरकारवर सडकून टीका केली. 'राज्य सरकारचा अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आहे. अर्थसंकल्पात नवीन काहीच नाही. केवळ दीनदयाळ उपाध्याय, नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित काही जुने प्रस्ताव आहेत,' अशा शब्दांमध्ये रावत उत्तराखंड सरकारवर बरसले.