नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला अपेक्षित जागा मिळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत जर काँग्रेसला प्रत्यक्ष निकालात 100 जागा मिळाल्या नाही तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकतो. मागील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपद मिळवितानाही काँग्रेसला अडचण निर्माण झाली होती. फक्त 44 जागांवर काँग्रेसला समाधान मानावं लागलं होतं.
गेल्या दिड वर्षापासून काँग्रेस नेतृत्वाची धूरा राहुल गांधी यांच्या हातात आहे. मागील 5 राज्यातील निवडणुकांनतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मिळालेलं यश वाखणण्याजोगे होते. त्यानंतर झालेल्या या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. निवडणुकपूर्व केलेल्या सर्व्हेक्षणामधून काँग्रेसला सहजासहजी केंद्रात सत्ता मिळविता येणार नाही. त्यामुळे 100 जागांचा आकडा पार करणे काँग्रेससाठी गरजेचे आहे अन्यथा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. मागील 5 वर्ष काँग्रेसने अनेक निवडणुकीत पराभवाचा सामना केला आहे. पण छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी सुधारली.या राज्यात सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश आलं. काँग्रेसच्या यशाचा हा आलेख यंदाच्या निवडणुकीत राखणं काँग्रेससाठी आव्हान बनलं होतं.
दरम्यान काँग्रेसची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी राहील. राहुल गांधी यांनी सामान्य गरिबांचा आवाज बुलंद केला आहे. राहुल गांधी यांची मेहनत आणि प्रयत्न या निवडणुकीत दिसलं आहे. त्याचे परिणाम निश्चित निकालात दिसतील असा विश्वास काँग्रेसचे नेते व्यक्त करत आहेत.
17व्या लोकसभेसाठी गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा रविवारी शांत झाला. सातव्या टप्प्यात 19 मे रोजी 59 जागांवर मतदान झालं असून, तत्पूर्वीच देशात कोणाचं सरकार येणार? यूपीए की एनडीए कोण बाजी मारणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. सरकार कोणाचं बनणार आणि देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार याचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे.