वायनाड : वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनीही वाराणसी मतदार संघातून प्रियंका गांधी निवडणूक लढवतील असे, संकेत दिले आहेत. मात्र, आज प्रियंका गांधी यांनी स्वत: वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढविण्याची संधी भेटली तर आपल्याला आनंद होईल, असे म्हटले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी वायनाडमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. 'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मला वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढविण्यास सांगितले, तर मला खूप आनंद होईल', असे यावेळी प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसकडून अद्याप वाराणसी मतदारसंघासाठी कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. मात्र, या मतदार संघातील कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियांका गांधी यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पक्षामध्ये गंभीरपणे विचार सुरु आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकेल अशा अन्य नावांबाबतही चर्चा सुरू आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार म्हणून या नावाला संमती मिळविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.
वेगळे निकाल शक्यया मतदारसंघात रोहनिया, वाराणसी (उत्तर), वाराणसी (दक्षिण), सेवापुरी आणि बनारस कॅण्टॉनमेंट हे पाच विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. २०१४च्या निवडणुकीमध्ये इथे मोदी यांना ५६.३६ टक्के मते मिळाली होती. तर कॉँग्रेस-सपा आघाडीला ७.३३ टक्के, बसपाला ५.८७ टक्के तर आम आदमी पार्टीला २०.२९ टक्के मते मिळाली होती. यंदा कोणतीही लाट नसल्याने कॉँग्रेस उमेदवाराला सर्व विरोधकांचा पाठिंबा मिळाल्यास वेगळे चित्र दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.