नवी दिल्ली : पठाणकोट हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ला म्हणजे भारतासाठी गंभीर इशारा असून अशीच परिस्थिती राहिली तर देश दहशतवाद्यांच्या तावडीत जाऊ शकतो, अशी भीती माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना दहशतवादी हल्ले रोखण्याकरिता केंद्र सरकारने निर्णायक पाऊल उचलले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी चुकीची जबाबदारी निश्चित करावी आणि जबाबदार व्यक्तीने राजीनामा द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. मोदी लोकसभा निवडणुकीपूर्वी पाकिस्तानबद्दल काय बोलले होते. मुंबई हल्ल्यानंतर त्यांनी कुठले वक्तव्य केले होते आणि आजही त्यांची हीच भूमिका कायम आहे काय? आणि नसेल तर या बदलामागील कारण काय? हे मोदींनी स्पष्ट केले पाहिजे, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)व्हिडिओ क्लिप दाखविलीनिवडणूक प्रचार काळात मोदी पाकबद्दल काय काय बोलत होते आणि आता मात्र कसे मौन पाळून आहेत हे दर्शविणारी एक व्हिडिओ क्लीपही काँग्रेसने यावेळी दाखविली. पठाणकोटमध्ये गोळीबार सुरू होता त्यावेळी मोदी योगाभ्यासावर भाषण देत होते.३१ डिसेंबर आणि १ जानेवारीदरम्यानच्या रात्री ३ वाजून ३४ मिनिटांनी दहशतवादी घुसले असल्याची गोपनीय सूचना मिळाली होती. मग कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केलापंतप्रधान, सरकारमधील मंत्री गप्प का? पठाणकोट हल्ल्यातील दहशतवाद्यांना साऱ्या सूचना पाकिस्तानातून मिळत होत्या. दहशतवाद्यांकडील शस्त्रे, वस्त्रे, स्फोटके, साधनसामुग्री इतकेच नव्हे तर पादत्राणेही पाकिस्तानी असल्याची खात्री पटली आहे. ही माहिती खरी असेल, तर पंतप्रधान व त्यांच्या सरकारचे मंत्री गप्प का आहेत? दहशतवादी पाकिस्तानी होते असा स्पष्ट उल्लेख करण्यास ते का घाबरत आहेत? दिल्लीत पाक उच्चायुक्ताला बोलावून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सदर प्रकरण सरकारने उपस्थित का केले नाही? मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची तातडीची बैठक घेउन पठाणकोट आॅपरेशनच्या नियंत्रणाची सारी सूत्रे पंतप्रधान, गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांनी आपल्या हाती का घेतली नाहीत, असे रोखटोक सवाल शिंदे यांनी केले.
...तर देश अतिरेक्यांच्या तावडीत
By admin | Published: January 07, 2016 12:04 AM