नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या घडत असतात. अशातच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात तैनात असलेल्या IPS अधिकाऱ्याच्या एका विधानाने नवा वाद निर्माण केला आहे. रामपूरचे पोलीस अधीक्षक अशोक कुमार शुक्ला यांनी जर मुलगी पळून गेली तर आई-वडिलांना जेलमध्ये पाठवू असं म्हटलं आहे. त्यांचं हे वादग्रस्त विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं असून अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र विधान व्हायरल झाल्यावर त्यांनी माफी मागितली आहे.
रामपूरच्या पोलीस लाईनमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये एसपी अशोक कुमार शुक्ला यांच्यासह अनेक लोक सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भाषणात मुलांकडे लक्ष देण्याकडे अधिक जोर दिला. समाजवादी पार्टीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अशोक कुमार शुक्ला यांनी "आता एक मोठा तमाशा झाला... पोलीस लाईनमध्ये एक मुस्लिम मुलगी एका हिंदू मुलासोबत किंवा एक हिंदू मुलगी मुस्लिम मुलासोबत जात होती... आता तुम्हीच पाहा की तुमच्या कुटुंबात असं का होत आहे? माझी मुलगी पळून गेली अशी तक्रार घेऊन आई-वडील माझ्याकडे आले तर त्यांना मी जेलमध्ये पाठवू इच्छितो" असं म्हटलं आहे.