श्रीनगर : भाजपा जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडल्यामुळे माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पीडीपीच्या अनेक नेत्यांनी मुफ्तींवर जाहीर टीका करत पक्ष सोडण्याची भाषा केली आहे. या पार्श्वभूमीवर मुफ्ती यांनी भाजपाला इशारा दिला आहे. पीडीपी फोडण्याचा प्रयत्न कराल, तर परिणाम गंभीर होतील, असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पत्रकारांशी संवाद साधताना 1990 मधील परिस्थितीचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी काश्मीर आणि दहशतवादी सलाऊद्दीनचा संदर्भ दिला. 1987 मधील घटनाक्रमाची आठवण करुन देत मुफ्ती यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला इशारा दिला. 'जर दिल्लीतील सरकारनं 1987 प्रमाणे लोकांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा, लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल,' असं मुफ्ती म्हणाल्या. 'त्यावेळी एक सलाऊद्दीन आणि यासिन मलिक जन्माला आले होते. यावेळी परिस्थिती आणखी चिघळेल,' असंही त्यांनी म्हटलं.
मेहबूबा मुफ्ती यांच्या विधानावर जम्मू-काश्मीर भाजपाचे अध्यक्ष रविंद्र रैना यांना आक्षेप नोंदवला. पीडीपीला फोडण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू नसल्याचं रैना यांनी सांगितलं. कालपासून मेहबूबा मुफ्ती यांनी पक्षातील बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विधान परिषदेचे सदस्य असलेल्या यासिर रेशी यांना बांदीपुरा जिल्हा अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. रेशी यांनी जाहीरपणे मुफ्ती यांच्यावर टीका केली होती. पीडीपीतील अनेक नेत्यांनी बंडाची भाषा केल्यानं मुफ्ती यांच्या अडचणी वाढल्या आहेत.