तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म नष्ट करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर, संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापले आहे. उदयनिधी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी डीएमके अर्थात द्रमुक आणि काँग्रेसला निशाण्यावर घेतले आहे. द्रमुक इंडिया आघाडीचा भाग असल्याने याची झळ काँग्रेसपर्यंत पोहोचली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तर, राहुल गांधीवर निशाणा साधत थेट काँग्रेसने द्रमुकसोबतची आघाडी तोडण्याची मागणी केली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "माझ्याकडे त्या नेत्याचे वक्तव्य आहे आणि असेच वक्तव्य काँग्रेसचे खासदार चिदंबरम यांनीही केले होते. मी काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांचेही कमी-अधिक प्रमाणात असेच विधान पाहिले आहे. माझ्याकडेही आहे. तामिळनाडूच्या मंत्र्याचा निषेध करण्याची माझी इच्छा नाही. कारण त्यांनी स्वतःच स्वतःचा पर्दाफाश केला आहे. मात्र प्रश्न आहे की, काँग्रेस अजूनही डीएमकेसोबत आघाडीत राहणार का? राहुल गांधींसाठी ही एक परीक्षा आहे. ते सनातन धर्माचा सन्मान करता की नाही? यासंदर्भात त्यांनाच निर्णय घ्यावा लागेल. जर त्यांनी डीएमकेसोबतचे संबंध तोडले नाही, तर ते हिंदू विरोधी आहेत, हे निश्चित होईल."
उदयनिधींनी सनातन धर्माची तुलना डेंगू, मलेरिया, कोरोनासोबत केली होती -उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी 'सनातन निर्मूलन परिषदे'त बोलताना सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समता विरोधी आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवाव्या लागतात. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. आपल्याला हे संपवायचे आहे. याच पद्धतीने आपल्याला सनातन संपवायचा आहे."